ठाणे : मुंब्रा-दिवा खाडीत वाळू माफियांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या जिल्हा महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काही वाळू माफियांनी दगड आणि मद्याच्या काचेच्या बाटल्या फेकून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही जिल्हा प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत वाळू माफियांचा ४ कोटी ६० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. हल्ल्याचा प्रयत्न झाला तरी वाळू तस्करांविरोधात कारवाई सुरूच राहील, अशी माहिती ठाणे उपविभागीय दंडाधिकारी अविनाश शिंदे यांनी दिली. या घटनेनंतर वाळू माफिया खाडीत उड्या टाकून पसार झाले. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या धडक कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील खाडी आणि नदी परिसरात अवैध पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. या संदर्भात वाळू माफियांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महसूल विभागामार्फत ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांवर दगड आणि मद्याच्या काचेच्या बाटल्या फोडून हल्ला

बुधवारी (३० मार्च) सकाळी ठाणे जिल्हा उपविभागीय दंडाधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार युवराज बांगर, महसूल विभागाचे चाळीस तलाठी आणि इतर कर्मचारी असे ५० जणांचे पथक तीन बोटींमधून मुंब्रा-दिवा खाडीत कारवाई करण्यासाठी पोहचले. अधिकाऱ्यांच्या बोटी पाहताच वाळू तस्करांनी त्यांच्या बोटींच्या दिशेने दगड आणि मद्याच्या काचेच्या बाटल्या फोडून भिरकावल्या. वाळू तस्करांच्या या हल्ल्यात कोणीही अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले नाहीत.

वाळू माफियांचा तब्बल ४ कोटी ६० रुपयांचा मुद्देमाल नष्ट

यानंतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा आल्याने वाळू तस्कर खाडीत उड्या मारून पसार झाले. यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी वाळू माफियांचा तब्बल ४ कोटी ६० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. यामध्ये एकूण ५ बोटी पाण्यात जाळून टाकण्यात आल्या. तसेच ६ बार्ज, ८ सक्शन पंप बुडवण्यात आले असून ३ मोठे २५ ब्रासचे बार्ज जप्त करून मुंब्रा गणेश घाट येथे विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात आले आहेत.

हेही वाचा : ठाणे – खाडीत रंगला थरार, अधिकाऱ्यांकडून वाळू माफियांचा बोटीने पाठलाग; घेरताच पाण्यात उड्या मारून पसार

या घटनेविषयी बोलताना ठाणे उपविभागीय दंडाधिकारी अविनाश शिंदे म्हणाले, “कारवाई करण्यासाठी गेलो असताना वाळू माफियांनी पथकावर हल्ला केला. पथकामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. यामध्ये अधिकाऱ्यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. जिल्हा प्रशासन वाळू तस्करांच्या हल्ल्याला भिक घालत नसून यापुढेही वाळू माफियांविरोधात धडक कारवाई करण्यात येईल.”

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sand smuggler attack on government officer in mumbra diva khadi pbs
Show comments