कोपर ते दिवादरम्यानची कांदळवने नष्ट करून रेती उत्खनन : डॉ. अश्विनी जोशी यांची बदली होताच जोरात धडाका
गेल्या वर्षभरात धडाकेबाज कारवाई करून जिल्ह्य़ातील रेती माफियांचे अक्षरश: कंबरडे मोडणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी यांची बदली होताच कोपर ते दिवादरम्यान पुन्हा एकदा वाळू माफियांनी उचल खाल्ली असून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस या मार्गावर तस्करांनी अक्षरश: घुसखोरी केल्याचे चित्र दिसून आले. कोपर ते दिवादरम्यानचा कांदळवनाचा पट्टा मागील दोन ते तीन वर्षांत वाळू तस्करांनी रेती उपशासाठी नष्ट केला आहे. जोशी यांच्या कार्यकाळात तस्करांना जरब बसल्याने या भागातील घुसखोरी काही प्रमाणात थांबली होती. शनिवारपासून याठिकाणी पुन्हा एकदा खारफुटींची कत्तल होऊ लागल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
कोपर ते दिवादरम्यानचा म्हातार्डेश्वर मंदिर परिसरातील खाडीकिनाराचा हिरवागार कांदळवनाचा पट्टा प्रवाशांना सदोदित सुखद गारवा देत होता. वाळू तस्करांनी कांदळवन नष्ट केल्याने हा परिसर भकास झाला आहे. वाळू तस्करांनी कोपर रेल्वे स्थानकाच्या दिशेने रेती उपसा करीत हा मोकळा भूभाग नष्ट करीत चालविला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी नियमित पाळत ठेवून या भागातील वाळू तस्करांचे कंबरडे मोडले. तेव्हापासून कोपर परिसरातील कांदळवनाचा पट्टा मोकळा श्वास घेत होता.
जोशी यांची बदली झाल्याने वाळू तस्कर पुन्हा सक्रिय होण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. शनिवार, रविवारी दुर्गाडी पूल ते कोन पट्टय़ात दिवसाढवळ्या काही वाळू तस्कर रेती उपसा करीत होते. या भागातील किनारा पोखरून काढण्यास तस्करांनी सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी जोशी यांची जरब असल्याने वाळू तस्करांनी कोपर, दिवा भागातून आपला बाजारबिस्तार गुंडाळला होता. मात्र जोशी यांच्या बदलीचे आदेश निघताच याच भागातील रेती माफिया पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कोपर, भोपर पूर्व भाग बेकायदा चाळींनी व्यापला आहे.
खाडीकिनारे वाळू तस्करांनी उखडून टाकले आहेत. त्यामुळे खाडीला उधाण आले तर हे सर्व पाणी डोंबिवली, दिवा, कोपर भागात शिरेल, अशी भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. कांदळवन नष्ट झाल्यामुळे खाडीचे पाणी थेट रेल्वेमार्गाखाली शिरले आहे. रेल्वेमार्गाखाली सतत पाणी झिरपून याठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती यापूर्वीही व्यक्त होत आहे.
नांगरलेल्या होडय़ा
कोपर भागातील रेल्वेमार्गालगच्या खाडीमध्ये वाळू उपसा करण्यासाठी लागणारी यंत्रणा असलेल्या २५ ते ३० होडय़ा नांगरण्यात आल्या आहेत. या होडय़ांमध्ये क्रेन व इतर यंत्रसामग्री आहे. यामुळे या भागाला एखाद्या मोठय़ा बंदराचे रूप आले असून रात्रीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात वाळू उत्खनन होण्याची शक्यता आहे.