ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकी निमित्त बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे बोलविलेल्या विशेष बैठकीसाठी नवी मुंबईतील भाजपाचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक आणि संजीव नाईक आनंद आश्रमाच्या दिशेने गेले खरे मात्र आनंद मठात प्रवेश न करताच ते पुन्हा माघारी परतले. आनंद मठाऐवजी लगेचच असलेल्या चिंतामणी चौकात मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेसाठी हे दोन नाईक बंधू आपल्या वाहनातच बसून होते. मात्र मुख्यमंत्री उशिरापर्यंत आनंद मठ येथे आले नाहीत आणि त्यांची वाट पाहून नाईक बंधू परतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईतील भाजपाचे मातब्बर नेते गणेश नाईक आणि मुख्यमंत्र्यांचे गुरु तसेच शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचे कधीच फारसे सख्य नव्हते. नाईकांनी शिवसेना सोडली आणि २००० सालच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी सिताराम भोईर या अगदी नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरवून आनंद दिघे यांनी नाइकांचा अडीच हजार मतांनी पराभव केला होता. तेव्हापासून नाईक आणि दिघे यांच्यात अधिकच बिनसले. थोरले नाईक दिघे यांच्या मृत्यूनंतरही कधी टेंभी नाका येथील आनंदाश्रमात गेले नाहीत की त्यांच्या समाधीचेही दर्शन त्यांनी घेतलं नाही. बुधवारी रात्री काही दशकानंतर नाईक यांचे दोन पुत्र संजीव आणि संदीप मात्र आनंद आश्रमाच्या दिशेने एका बैठकीच्या निमित्ताने आलेले पाहायला मिळाले. ठाणे लोकसभा मतदार संघातील निवडणूक तयारीच्या निमित्ताने आणि नवी मुंबई मीरा भाईंदर या शहरांमधील आमदार महायुतीचे नेते पदाधिकारी यांची एक तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भिवंडीतील सभा आणि मुंबईतील रोड शो आटोपून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा जोगेश्वरीला रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघाकडे वळविला.

आणखी वाचा-ठाकरे गटाकडून पाकिस्तानची हुजरेगिरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

दरम्यानच्या काळात आणि लोकसभेतील महायुतीच्या नेत्यांना रात्री नऊ वाजल्यापासूनच आनंदाश्रमात बोलवण्यात आले होते. नवी मुंबईतील शिंदे सेनेचे नेते विजय नाहता, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, प्रमुख समन्वयक किशोर पाटकर यांच्यासह या भागातील ज्येष्ठ नगरसेवक आनंदाश्रमात दाखल झाले होते. ओवला माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक, मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन, मीरा-भाईंदर मधील भाजप नेते नरेंद्र मेहता, महाडचे आमदार भरत गोगावले यासारखे नेतेही आनंद आश्रमात दाखल झाले होते. साधारण रात्री साडेदहा वाजल्यापासून मुख्यमंत्री येणार अशी चाहूल आनंद आश्रमात सर्वाना लागली होती. याच काळात गणेश नाईक यांचे पुत्र संदीप आणि संजीव यांच्या वाहनांचा ताफा ही आनंदाश्रमाच्या दिशेने आला. नाईक पुत्रांचा हा ताफा पाहून टेंभी नाक्या भोवती जमा असलेल्या राजकीय गर्दीचे डोळे विस्फारले. नाईक आणि दिघे यांच्यातील राजकीय वितुष्ठ हे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहित आहे.

२००० झाली झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवनंतर नाईक कुटुंबातील कुणीही आनंद आश्रमात पाऊल ठेवलेले नाही. मात्र खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच बोलविलेल्या बैठकीसाठी नाईक पुत्रांना आनंद आश्रमाच्या दिशेने यावेच लागले. मुख्यमंत्र्यांनी निरोप धाडूनही थोरले नाईक काही आश्रमातील बैठकीसाठी आले नाहीत. रात्री साडेदहा पावणे अकराच्या सुमारास नाईक पुत्र वाहनांमधून आनंद आश्रमाच्या दिशेने आले खरे मात्र आश्रमात येण्याऐवजी त्यांनी तलाव पाळी लगत असलेल्या चिंतामणी चौकात आपली वाहने उभी केली. आणि बराच काळ ते वाहनांमध्ये बसून होते. साडेअकरा वाजून गेले तरी मुख्यमंत्री काही येत नाहीत ते पाहून अखेर नाईक पुत्रांनी आणि लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना निरोप धाडला. आपण जो निर्णय घ्याल त्यास आमची सहमती असल्याचे सांगून आम्ही निघतो असे त्यांनी मस्के यांना कळवले.

आणखी वाचा-रणरणत्या उन्हात कार्यकर्ते कल्याणमधील मोदींच्या सभेसाठी; भिवंडी, कल्याण ग्रामीण भागातून सर्वाधिक गर्दी

निवडणूक काळातील नाईकांचे महत्त्व लक्षात घेऊन म्हस्के यांनी तातडीने चिंतामणी चौकात जात संदीप नाईक आणि संजीव नाईक यांची भेट घेतली. साहेबांपर्यंत मी आपला निरोप पोहोचवतो या शब्दात मस्के यांनी या दोघांचा निरोप घेतला. अनेक वर्षानंतर नाईक कुटुंबातील कुणीतरी आनंद आश्रमात बैठकीसाठी येणार याचे कुतुहूल येथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच होते. नाईक जेव्हा चिंतामणी चौकात वाहनांमध्ये बसून होते तेव्हा आनंदाश्रमात इ तर आमदार मंडळी एकमेकांसोबत गप्पांमध्ये रंगली होती. नाईक यांचे दोन पुत्र बाहेर येऊनही आश्रमात का आले नाहीत याची चर्चा त्यानंतर या मंडळींमध्ये रंगली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandeep naik and sanjeev naik did not attend cm eknath shinde meeting at anand ashram mrj