कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या टिटवाळा परिसर अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त पदावरून संदीप रोकडे यांना तडकाफडकी हटवून या पदावर आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी प्रमोद पाटील यांची गुरुवारी नियुक्ती केली. पाटील यांना तात्काळ या पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. प्रमोद पाटील ब प्रभागात अधीक्षक पदावर कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी साहाय्यक आयुक्त म्हणून डोंबिवली ह प्रभागात काम केले आहे. खमस्या, कठोर शिस्तीचा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ह प्रभागात असताना त्यांनी राजकीय दबाव झुगारून बेकायदा बांधकामांच्या विरुध्द जोरदार मोहीम सुरू केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टिटवाळा, बल्याणी परिसरात बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे अधिक प्रमाणात येत होत्या. यापूर्वी आयुक्तांनी अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त रोकडे यांना बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तेवढ्यापुरतीच त्यांच्याकडून कारवाई केली जात होती.

पालिकेतील दोन उपायुक्तांच्या शिफारशीवरून आयुक्तांनी रोकडे यांना अ प्रभागाचा साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार गेल्या वर्षी दिला होता. रोकडे यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी म्हणून दोन्ही उपायुक्तांनी वेळोवेळी रोकडे यांना तंबी दिली होती. तरीही त्यांच्या कार्यपध्दतीत सुधारणा होत नव्हती. आयुक्तांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सूचित केले होते. ह प्रभागात असताना रोकडे बेकायदा बांधकामांच्या विषयावरून वाद्गग्रस्त ठरले होते. पालिकेच्या सेवेतील शासन मान्यता साहाय्यक आयुक्त रोकडे आहेत.

दोन आठवड्यापासून आयुक्तांनी संदीप रोकडेंच्या जागी नवीन आयुक्त नेमण्याची कार्यवाही सुरू केली होती. बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळ्यात खमक्या साहाय्यक आयुक्ताची गरज होती. पाटील ती जबाबदारी पार पाडतील याची खात्री पटल्यावर आयुक्तांनी त्यांची तात्काळ अ प्रभाग साहाय्यक आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग क्षेत्रात खमक्या साहाय्यक आयुक्त नियुक्तीसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे समजते. यासंदर्भात स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रभागांमध्ये कर्तव्यदक्ष नेमण्याची सूचना पालिका प्रशासनाला केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandeep rokde removed assistant commissioner of titwala area a ward of kalyan dombivli municipality sud 02