अपूर्वा पुरषोत्तम आगवण. क्रायसिस फाऊण्डेशनच्या शाश्वत विकास या सोशल विभागाची ‘व्हाइस प्रेसिडेण्ट’. देहबोलीतून प्रतीत होणारा सळसळता उत्साह, प्रसन्नतेने उजळलेला चेहरा, विलक्षण चमकदार डोळे, यातून तिने निवडलेल्या वेगळ्या वाटेवरचा ‘आनंद’ प्रतीत होत होता. अपूर्वाच्या गळ्यात गाणं होतच. कॉलेजमध्ये जायला लागली आणि तिला पाश्चिमात्य संगीताचं आकर्षण वाटू लागलं. त्या सुरांशी सलगी करण्यासाठी ती वांद्रय़ाला फर्नाडिस यांच्याकडे जाऊ लागली. त्या वेळी सिमेन्समध्ये नोकरी करणाऱ्या फर्नाडिस यांनी ‘फोर्थ ब्रेन मेथड’ म्हणून मेंदूचा पुढचा भाग जो कधी वापरला जात नाही, त्याचा वापर करून त्यावर आधारित शिक्षणपद्धती विकसित केली होती. ही शिक्षणपद्धती, जी कुठल्याही क्षेत्रात वापरता येते, ती वेगवेगळ्या शिक्षणक्षेत्रात, विविध पातळींवर उपयोगात आणून, जास्तीत जास्त प्रगत तंत्रज्ञान (अगदी क्रिमीलेअर) निर्माण करून त्याच्या साह्य़ाने गरिबातल्या गरिबांचा विकास घडवून आणायचा, असा फर्नाडिस सरांचा हेतू होता. गाणं शिकण्यासाठी आलेल्या तरुणाईशी याबाबत मनमोकळी चर्चा होत असे. त्या शिक्षण पद्धतीने मिळालेल्या यशाचा अनुभवही ती मुले घेत होती. हळूहळू सरांच्या विचारांचे बीज रुजत गेले आणि अशा ‘धडपडय़ां’चा एक गटच तयार झाला.
सर्वाची शिक्षणं चालू असतानाच ‘गरिबांचा शोध’ घेण्याच्या ध्यासाने पाच-सहाजणांचं त्यांचं टोळकं टाणे ते ओरिसा या ‘ट्रायबल’ पट्टय़ात भटकंतीला निघाले. संबळपूर जिल्ह्य़ात फिरताना एका ठिकाणी एक हृदयद्रावक दृश्य बघून ते सर्वजण हबकून गेले. प्रसूतीनंतर एक स्त्री प्राणांतिक वेदना सहन करीत विव्हळत पडली होती. खासगी दवाखान्याचा खर्च परवडणारा नव्हता आणि सरकारी दवाखान्यात न्यायला वाहन नव्हतं आणि रस्ताही नव्हता. ‘तिची दोन मुलंही मेली आहेत. आता तिलाही मरू दे,’ ही तिच्या माणसाची निर्णायक प्रतिक्रिया ऐकून एका विशिष्ट हेतूने भ्रमंती करणाऱ्या या गटाला असा धक्का बसला की त्याने त्यांच्या शोधमोहिमेच्या गाडीला नेमकी ‘दिशा’ सापडली.
येऊरच्या आदिवासींचा विकास, हे ध्येय ठरले. या ध्येयाला पूरक होईल म्हणून अपूर्वाने अण्णामलई विद्यापीठातून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले. याशिवाय सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट- शाश्वत विकास या विषयाचा अभ्यास करून यूकेमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले. सॉफ्टवेअर इंजिनीअर, डॉक्टर, कायदेपंडित अशा वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधील तज्ज्ञांचा एक गटच तयार झाला.
आदिवासींचे प्रश्न, त्यांच्या समस्या, आवडी-निवडी, जीवनशैली याबाबत फक्त पुस्तकीज्ञान नाही तर त्यांच्याशी ओळख, परिचय, सहवास आणि त्यांचा विश्वास संपादन करण्याचे प्रयत्न चालू झाले. पाडय़ावर जाऊन अडचणी जाणून घेतल्या. फसवणूक त्यांच्या पाचवीला पुजलेली आहे हे लक्षात आले. त्यांचे कायदेशीर प्रश्न लक्ष घालून सोडविल्यावर ‘ही भली माणसं आहेत’ असा विश्वास अपूर्वा आणि तिच्या सहकाऱ्यांबद्दल निर्माण झाला. हे सर्व करण्यासाठी आदिवासींच्या सान्निध्यात त्यांच्यासारखेच राहणे क्रमप्राप्त होते. अशा वेळी पुरुषोत्तम आगवण पाठिशी उभे राहिले आणि येऊरला बांबूंच्या भिंतींचा ‘अनंताश्रम’ मिळाला.
या कार्यात कुणाकडे हात पसरायचे नव्हते. त्यामुळे ‘फोर्थ ब्रेन मेथड’च्या साह्य़ाने गटातले इंजिनीयर्स माधवबागेत अत्याधुनिक सॉफ्टवेअर बनविण्यात गुंतले. अपूर्वाने सामाजिक प्रश्नांची जबाबदारी स्वीकारीत येऊरच्या अनंताश्रमात राहणे पसंत केले. डॉक्टर, आदिवासी आणि त्यांच्या मुलांची आरोग्याबाबत काळजी घेऊ लागले. कोणी कॉम्प्युटरच्या साह्य़ाने अभ्यासवर्ग घेऊ लागले. सॉफ्टवेअर विकून पैसा उभा करायचा आणि तो आदिवासींच्या विकासासाठी, उत्कर्षांसाठी वापरायचा. अर्थात आदिवासींना त्यात सामावून घेत, ही मूलभूत कल्पना. टोळक्याच्या पोटापाण्यासाठी ही एकत्रित काम आणि अर्थ नियोजन. काही वर्षांच्या अथक परिश्रमानंतर क्रायसिस- ‘क्रिएटिव्ह रिस्पॉन्सिबल इन्टिग्रेटेड सिस्टम’ या नावाने या कर्मयोगाला ओळख प्राप्त झाली.
येऊरच्या जंगलात जीवावर बेतलेल्या विंचू, सर्पदंशाच्या घटना तर नित्याच्याच. पण वेदनांनी तडफडणाऱ्या व्यक्तीला दवाखान्यापर्यंत न्यायचे कसे? जव्हार, मोखाडा भागात ते तीव्रतेने जाणवले. मग क्रायसिसने वजनाला हलकी, युनिक, मोनोव्हील अॅम्ब्युलन्सची निर्मिती करून पेटन्ट घेतले. आदिवासींच्या सेवेला ती मोफत रुजू झाली. आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टॉयलेटची सोय करणे आवश्यक होते. विचारांती डिझाइन रेखाटले गेले. वाहून नेण्यास सोपे, शाश्वत पाण्याची सोय असणारे, मैल्याची विल्हेवाट प्रदूषण न होता करणारे, आदिवासींना ते स्वच्छ राखण्यास सोपे पडेल असे पाच टॉयलेट येऊरच्या पाटोणेपाडा येथे ठेवण्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबी पुऱ्या होत आल्या आहेत. मैल्याचे पृथक्करण करण्यासाठी विशिष्ट किडे, किडे खायला कोंबडय़ा, त्यांचे पालनपोषण करून पोट भरणारे आदिवासी अशा चक्राने टॉयलेटचे व्यवस्थापन आदिवासींकडूनच केले जाणार आहे.
सुचित्रा साठे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा