कल्याण- कल्याण डोंबिवली पालिकेतील २२०० सफाई कामगारांपैकी १५८ सफाई कामगार पालिकेच्या १० प्रभाग कार्यालयात शिपाई, फेरीवाला हटाव पथकात काम करतात. काही कामगार पालिका मुख्यालयात विविध अधिकाऱ्यांच्या दालनात शिपाई म्हणून काम करतात. पुरसे सफाई कामगार रस्त्यावर नसल्याने शहरात वेळोवेळी कचऱ्याची समस्या निर्माण होते. आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी गेल्या महिन्यात एक आदेश काढून कार्यालयांमध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या सफाई कामगारांनी तातडीेने घनकचरा विभागातील मूळ पदस्थापनेच्या जागी हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे : “पहाटेपर्यंत संगीत आणि मद्य पार्ट्या…” येऊर परिसरातील लोकांच्या धिंगाण्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड संतापले

प्रभागातील साहाय्यक आयुक्तांनी, मुख्यालयातील विभाग प्रमखांनी तातडीेने आपल्या अखत्यारितील शिपाई, फेरीवाला हटाव पथकात काम करणाऱ्या कामगारांना मुक्त करायचे आदेश आहेत. घनकचरा विभागाचे उपायु्क्त अतुल पाटील यांनीही सर्व साहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून आपल्या कार्यालयातील सफाई कामगारांना मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. दीड महिना झाला तरी १५८ पैकी फक्त ३० ते ३५ कामगार घनकचरा विभागात हजर झाले आहेत. घनकचरा विभागात हजर झाल्यानंतर रस्त्यावर सफाईची कामे करावी लागतात. यासाठी अनेक कामगार राजकीय आशीर्वादाने पालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालयांमध्ये शिपाई म्हणून काम करणे पसंत करतात. विशेष म्हणजे हे कामगार सफाई कामगार म्हणून प्रशासनाकडून मिळणारा गणवेश इतर लाभ हक्काने पदरात पाडून घेतात, अशी माहिती आहे.

हेही वाचा >>> लाचखोर सहाय्यक आयुक्त अटकेत ; बांधकामाला संरक्षण देण्यासाठी स्वीकारली लाच

आदेश दुर्लक्षित

आयुक्तांनी कामगारांना घनकचरा विभागात तातडीने हजर होण्याचे आदेश देऊनही कामगार त्यास जुमानत नसल्याने आरोग्य अधिकारी आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही साहाय्यक आयुक्तांनी मालमत्ता कर, पाणी वसुलीचे दिवस आहेत. त्यामुळे तातडीने कामगार सोडणे शक्य होणार नाही अशी भूमिका घेऊन कामगारांना पाठबळ देण्यास सुरुवात केली आहे. बहुतांशी कामगारांनी प्रशासनावर राजकीय दबाव आणून आपल्या बदल्या होणार नाहीत अशी व्यवस्था केली आहे, असे समजते.

उपायुक्त दिवेंकडून छेद

आयुक्त दांडगे, उपायुक्त पाटील यांनी सफाई कामगारांना घनकचरा विभागात तातडीने हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाला बगल देत सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी ३ मार्च रोजी १५ सफाई कामगारांना पालिका मुख्यालयातील विविध विभागात शिपाई म्हणून हजर होण्याचे आदेश दिल्याने, प्रशासनात ताळमेळ राहिला आहे की नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ठराविक १५ कामगारांना शिपाई म्हणून ठेवण्याचे सामान्य प्रशासन विभागाचे प्रयोजन काय असे प्रश्न बदलीच्या ठिकाणी हजर झालेले कामगार करत आहेत.

कचरा मुक्त शहर करण्यासाठी घनकचरा विभाग प्रयत्नशील आहे. स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने शहराच्या अनेक भागात कचऱ्याची समस्या आहे, असे सफाई विभागातील अधिकारी सांगतात.

“ प्रभाग, मुख्यालयातील कामगार अशी येथे विभागणी आहे. प्रभागस्तरावरील किती कामगार मुक्त करण्यात आले आहेत याची माहिती साहाय्यक आयुक्तांकडून मागविण्यात आली आहे. दोन दिवसात हजर कामगारांची माहिती घेऊन जे कामगार हजर होत नाहीत त्यांच्याबाबतीत निर्णय घेतला जाईल.” अतुल पाटील- उपायुक्त घनकचरा विभाग

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanitation worker ignored order of kdmc commissioner zws