वर्तकनगर, लोकमान्यनगर, इंदिरानगर भागांत थेट घरांत घुसखोरी; खाद्यपदार्थासह भांडी आणि मोबाइलही लंपास

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असणाऱ्या वर्तकनगर, देवदयानगर, कोलशेत रस्ता, इंदिरानगर, लोकमान्यनगर आणि सावरकरनगर या भागांत गेल्या काही महिन्यांपासून माकडांनी अक्षरश: धुडगूस घातला असून घरात शिरून मोबाइल, भांडी, खाद्यपदार्थ ही माकडे पळवून नेऊ लागल्याने रहिवाशांच्या नाकीनऊ आले आहेत. माकडांनी उच्छाद मांडलेल्या परिसरातील रहिवाशांनी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, वनविभागासह अनेक शासकीय विभाग गेल्या काही काळापासून निवडणूक कामात व्यस्त असल्याने या खोडसर माकडांचा बंदोबस्त करण्यात प्रशासकीय यंत्रणाही अपुरी ठरू लागली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असणाऱ्या इंदिरानगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर, देवदयानगर, वर्तकनगर, लोकपुरम, घोडंबदर परिसर या भागांत मोठय़ा प्रमाणात लोकवसाहती आहेत. गेल्या महिनाभरापासून या भागात माकडांनी उच्छाद मांडला आहे. लोकवसाहतीतून माकडांना दूर करण्यासाठी फटाके फोडणे आदी उपाय वनविभागाकडून हाती घेण्यात आल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असले तरी अद्याप कोणत्याही माकडाला पिंजऱ्यात पकडण्यात आले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दोन आठवडय़ांपूर्वी सावरकरनगर येथील ज्ञानदेव शाळा परिसरातील एका इमारतीमध्ये दुपारच्या वेळेस एका रहिवाशाच्या घराच्या खिडकीत ठेवलेला मोबाइल घेऊन एका माकडाने पळ काढला. तर त्याच परिसरातील दुसऱ्या इमारतीमधील घरात खिडकीवाटे शिरून खाद्यपदार्थ ठेवलेली भांडी, फळे चोरून पळ काढला.

घोडबंदर परिसरातील काही गृहसंकुलांमध्येही गेल्या काही महिनांपासून माकडांनी उच्छाद मांडला असून वनविभाग आणि प्राणी संघटनांतर्फे या परिसरामध्ये दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. याप्रकरणी ठाणे वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

माकड हा प्राणी खूप चपळ आहे. अनेकदा हा प्राणी तावडीत सापडत नाही. त्याला ‘डार्टिग’ करून पकडणे हे जिकिरीचे असते. यामुळे त्याच्या जिवाला धोका पोहोचू शकतो. नेम चुकल्यास तो अधिक चवताळून त्रास देण्याची शक्यता असते. – आदित्य पाटील, संस्थापक-वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन

माकडांनी मोठा उच्छाद मांडला असून रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माकडांच्या या उपद्रवामुळे घराच्या खिडक्यांना जाळी बसवण्याचा निर्णय इमारतीतील सर्व रहिवाशांनी घेतला आहे. – सूरज कोकाटे, रहिवाशी