मुख्यमंत्र्यांविरोधात लढविली होती निवडणुक : पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने घाडीगावकरांची घरवापसी
ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदार संघातील त्यांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे संजय घाडीगावकर यांच्यासह त्यांच्या १५० समर्थकांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. या पक्ष प्रवेशाच्यावेळी घाडीगावकर यांनी केलेल्या विनंतीनुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यता जाहीर सभा घेण्याचे आश्वासन दिले असून ही सभा दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने ठाकरे गटाने आता शहरात पक्षाची ताकद वाढविण्यास सुरुवात केल्याचे चित्र असून घाडीगावकर यांचा पक्षाला किती फायदा होतो, हे येत्या काळाच स्पष्ट होईल.
संजय घाडीगावकर यांनी २००५ मध्ये शिवसेनेला रामराम ठोकत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या किसननगर भागातून संजय घाडीगावकर हे काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडुण आले होते. महापालिकेत काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. याशिवाय, २०१६ मध्ये किसननगर भागातील पोटनिवडणुकीत त्यांनी शिवसेनेचा पराभव करत एक उमेदवार निवडुण आणला होता. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१७ मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुक लढले. त्यावेळी त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपमधून निवडणुक लढविली होती. त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
२०१९ मध्ये ते कोपरी पाचपखाडी मतदार संघातून शिंदे यांच्याविरोधात निवडणुक लढण्यासाठी इच्छूक होते. परंतु ऐनवेळेस शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने त्यांनी भाजपपासून फारकत घेत अपक्ष निवडणुक लढविण्याची तयारी सुरु केली होती. उमेदवारी दाखल करण्याच्या नऊ दिवस आधी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याची तयारी दाखविली आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर या प्रभागातून निवडणुक लढविली. त्यात त्यांनी २९ हजारांच्या आसपास मते घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदार संघातील त्यांचे विरोधक म्हणून संजय घाडीगावकर हे ओळखले जात असून त्यांनी आणि त्यांच्या १५० कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना शिवबंधन बांधले. खासदार विनायक राऊत ,राजन विचारे ,जिल्हा प्रमुख केदार दिघे ,मधुकर देशमुख, प्रदीप शिंदे हे त्यावेळी उपस्थित होते. या पक्ष प्रवेशाच्यावेळी घाडीगावकर यांनी केलेल्या विनंतीनुसार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यता जाहीर सभा घेण्याचे आश्वासन दिले असून ही सभा दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. भविष्यात ठाण्यात संघटना मजबूत करण्यासाठी झटणार असल्याची प्रतिक्रीया घाडीगांवकर यांनी दिली आहे.