ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मागे घेतल्यानंतरही शिंदे सेनेचे संजय भोईर हे प्रचारापासून दूर असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली होती. परंतू केळकर यांनी गुरुवारी सायंकाळी भोईर यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असून या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रचार रणनीती बाबत चर्चा झाल्याने अखेरच्या क्षणी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्यासाठी शिंदेच्या सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे हे इच्छूक होते. परंतु हा मतदार संघ महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या वाट्याला गेला असून येथून भाजपने आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेले संजय भोईर आणि मिनाक्षी शिंदे यांनी अपक्ष निवडणुक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दोघांनी अर्ज दाखल केले नव्हते. यामुळे या मतदार संघातील बंडखोरी टळली होती. असे असले तरी संजय भोईर, मिनाक्षी शिंदे हे दोघेही केळकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय केळकर यांच्या समक्ष मिनाक्षी शिंदे यांच्यासह स्वपक्षातील नाराजांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची नाराजी दूर केली होती. यानंतर मीनाक्षी या सुद्धा प्रचार सुरू केला होता. असे असले तरी संजय भोईर मात्र प्रचारापासून दूर होते. बाळकूम, माजीवडा, कोलशेत भागातुन भोईर यांचे सहा नगरसेवक निवडून येतात. या भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे. ते प्रचारापासून दूर असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली होती. भाजप उमेदवार संजय केळकर यांनी गुरुवारी सायंकाळी शिंदेच्या शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी केळकर यांनी भोईर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रचार रणनीती बाबत चर्चा झाल्याने अखेरच्या क्षणी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र आहे.
संजय केळकर आणि संजय भोईर यांनी विविध प्रश्नांबरोबरच प्रचाराच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाली. भविष्यात बाळकूम-ढोकाळीतील नागरिकांना परिपूर्ण सुविधा मिळतील, यासाठी कटीबद्ध असल्याचे केळकर यांनी सांगितले. तसेच या भेटीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा विक्रमी मताधिक्याने विजय साकारण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, ठाणे विधानसभा निवडणूक प्रमुख सुभाष काळे, शिंदेच्या शिवसेनेचे शहरप्रमुख हेमंत पवार, विद्याधर वैशंपायन, माजी नगरसेवक भुषण भोईर हे उपस्थित होते, अशी पोस्ट संजय भोईर यांनी समाजमाध्यमांवर करत भेटीचा फोटो शेअर केला आहे.