पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि महाराष्ट्रासह देशभरातले २६ पर्यटक या हल्ल्यात मारले गेले. पहलगाम या ठिकाणी जे पर्यटक मारले गेले त्यात महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा समावेश होता. या सहापैकी तीन जण डोंबिवलीचे होते. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तीन मावस भावांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर संजय लेलेंचा मुलगा हर्षल याने या हल्ल्याचा थरार सांगितला. जोशी, लेले आणि मोने कुटुंबाने पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी त्यांना काय सहन करावं लागलं ते सांगितलं.
हर्षल लेले काय म्हणाला?
“दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला तेव्हा माझा हात माझ्या वडिलांच्या (संजय लेले) डोक्यावर होता. बाबा त्यांना सांगत होते की तुम्ही गोळीबार करु नका. त्यांनी हात वर केला होता. त्यावेळी माझ्या हाताला काहीतरी जाणवलं. आधी मला वाटलं माझ्या हातावर गोळी लागली आहे. मी पटकन झुकलो आणि उठून नंतर पाहिलं तर वडिलांचं डोकं पाहिलं तर ते रक्ताने पूर्ण माखलं होतं. मी हे सगळं पाहिलं तेव्हा आम्हाला स्थानिकांनी सांगितलं की तुम्ही आधी तुमचा जीव वाचवा. जिथे गोळीबार झाला ती जागा अशी आहे जिथे घोड्याने जायला तीन तास लागलात. त्या भागात फक्त घोड्यानेच जाता येतं. गाडी किंवा सायकल वगैरे काहीही जात नाही. हल्ला झाल्यानंतर घोडेवाले सगळे आले. बाकीचे चालत उतरत होते. चालत उतरण्यासाठी आम्हाला चार तास लागले. माझ्या आईला अर्धांगवायू आहे. तिला मी आणि माझ्या भावाने खांद्यावर उचलून आणलं. काही अंतरावर घोडे होते. मग घोडा करुन आम्ही तिला आधी बेसला पाठवलं. आम्ही चार तास चालत बेसला पोहचलो. मला आणि इतर सगळ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. “
दुपारी २ ते अडीचच्या सुमारास गोळीबार झाला होता
पहलगाम क्लब म्हणून जागा आहे तिथे आम्हाला बसवण्यात आलं. साधारण दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. आम्ही संध्याकाळी ६ च्या सुमारास पोहचलो. पुढचे काही तास काहीही माहिती आम्हाला मिळाली नव्हती. त्यानंतर ७.३० च्या सुमारास मला कळलं होतं की तिघांचा मृत्यू झाला. माझ्या काकांनी एका आयपीएस अधिकाऱ्याशी बोलून त्यांच्या घरी राहू दिलं. सकाळी ७ च्या सुमारास मला कळवण्यात आलं की तुम्हाला मृतदेहांची ओळख पटवायची आहे. मी ओळख पटवली आणि परत आलो तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं. त्यांनी आम्ही पोलीस कंट्रोल रुममध्ये गेलो. त्यावेळी ओमर अब्दुला, अमित शाह हे सगळे तिथे आले होते. एका चार वर्षांच्या मुलावरही गोळीबार केल्याचं कळलं. त्यानंतर माझे काका आणि इतर नातेवाईक घ्यायला आले होते. नंतर आम्ही मुंबईत आलो. आम्ही तिघांचे मृतदेह घेऊन आलो आणि बुधवारी अंत्यसंस्कार पार पडले असं हर्षल लेलेने सांगितलं.