ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) हिंदी भाषी कार्यकर्त्यांचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काही लोकांना लवकरच ठाणे सोडून पळून जावे लागणार आहे, अशी अप्रत्यक्षपणे टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “ठाण्याचं नाव काढलं तरी, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे यांच्या नावाने रोमांचं उभे राहतात. ठाणे शहराचा अर्थ म्हणजे निष्ठा. शिवसेनेला पहिली सत्ता दिली आणि भगवा झेंडा फडकवला, ते ठाणे शहर आहे. गडकरी रंगायतन सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांची देण आहे. याच गडकरी रंगायतनमध्ये तिच निष्ठा, श्रद्धा आणि ताकद आहे. ही गर्दी पाहून मला वाटलं, काही लोकांना लवकरच ठाणे सोडून पळून जावं लागणार आहे.”
“आम्ही ठाण्यात येणार आणि येत राहणार. कारण, हे ठाणे शहर आमचं आहे. कोणीही आम्हाला रोखू शकत नाही. ‘हम तख्त बदलेंगे… ताज बदलेंगे… गद्दारोका राज बदलेंगे’. हा संदेश फक्त ठाणे शहरातून द्यायचा होता. त्यामुळे आम्ही ठाण्यात आलो आहोत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
“ठाणे हे मर्दांचं शहर होते आणि राहिलं. डरपोकांचं शहर म्हणून ठाणे आम्ही कधीच ऐकलं आणि पाहिलं नाही. आनंद दिघे यांच्याकडे पाहून आम्हाला नेहमी हिंमत यायची. कोणत्याही संकट्याशी सामना करत बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून ते उभे राहिले. संकटात पळून जातो, तो नामर्द असतो,” अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.