मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख करत ठाकरे गटानं थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल केला आहे. यासाठी संजय राऊतांनी त्यांच्या एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये थेट ठाणे पोलीस विभागानं जारी केलेल्या अधिसूचनेचा फोटोच शेअर केला आहे. या फोटोमध्ये ठाण्याच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिलेल्या आदेशांची माहिती असून त्यावरून आता ठाकरे गटानं आपला आक्षेप नोंदवला आहे.
काय आहे संजय राऊतांच्या पोस्टमध्ये?
संजय राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये ‘पोलीस खात्याची मिंधेगिरी’ म्हणत वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेवर आक्षेप घेतला आहे. “मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या कुटुंबाला ये-जा करण्यासाठी ठाण्यातील आख्खा सर्विस रोडच बंद केला जातो. हे जरा अतीच झालं असं नाही का वाटत गृहमंत्रीजी? पोलीस खात्याची मिंधेगिरी”, असं या पोस्टमध्ये संजय राऊतांनी नमूद केलं आहे.
ठाणे पोलिसांच्या अधिसूचनेत काय?
दरम्यान, संजय राऊतांनी शेअर केलेल्या अधिसूचनेमध्ये ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्तांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिल्याचा उल्लेख आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वागळे इस्टेट लुईस वाडीतील खासगी निवासस्थानी त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांची ये-जा असते. त्यामुळे या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणं आवश्यक आहे”, असं यात म्हटलं आहे.
वाहतुकीत कोणता बदल?
१ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेत या भागातील वाहतुकीत कोणत्या प्रकारचा बदल करण्यात आला, यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ठाण्यातील नितीन ब्रिजखालून प्रजा स्नॅक्ससमोरून सर्व्हिस रोडने लँडमार्क सोसायटी, काजूवाडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रजा स्नॅक्स येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांसाठी नितीन ब्रिजखालून कामगार नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याने सरळ जाऊन पुढे अपोलो फार्मसी मेडिकल, रामचंद्रनगर, जिजामाता नदर इथून डावे वळण घेऊन इच्छित स्थळी जाण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याशिवाय, काजूवाडी कट या ठिकाणाहून सर्व्हिस रोडने पजा स्नॅक्सकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना काजूवाडी कट, लँडमार्क सोसायटी कॉर्नर इथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यांना काडूवाडी कटवरून उजवं वळण घेऊन हायवे स्लीप रोडने पुढे इच्छित स्थळी जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
वाहतुकीतील हे बदल १ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत लागू राहतील. ही अधिसूचना पोलीस वाहनं, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू नसेल, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.