सोमवारी रात्री ठाण्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली असून यात महिला जखमी झाली आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार चालू आहेत. या प्रकाराचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ठाकरे गटाकडून या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला जात असताना खासदार संजय राऊतांनी यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“..तर मुख्यमंत्र्यांना घरात कोंडून घ्यावं लागेल”

संजय राऊतांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंच हे होत आहे. हे ठाण्यातच का होतंय? संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही यांना पुरून उरलो आहोत. कोण आहेत हे? हे ठाण्यात होतंय कारण मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. त्या भागातली पोलीस यंत्रणा ही त्यांची गुलाम आहे. पोलिसांना मी सांगू इच्छितो, बघ्याची भूमिका घेणाऱ्यांना सांगू इच्छितो की ठाण्यात आम्हालाही घुसता येतं. ठाण्यात तुम्हाला स्वत:ला घरात कोंडून घ्यावं लागेल. त्यामुळे हे आम्हाला तु्म्ही सांगू नका”, असं संजय राऊत म्हणाले.

“नरेंद्र मोदींसारखा माणूस या जगात जन्मालाच आला नाही”, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला; म्हणाले, “आमचा श्वास, ही हवा…”

“बेदम मारहाण आम्हीही करू शकतो. बेदम मारहाण पोलिसांच्या संरक्षणात होतेय हे महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही गृहमंत्री आहात म्हणून आम्ही तुम्हाला हे सांगतोय. तुम्ही बाजारबुणगे, बाजारबुणगे म्हणताय. तुमच्यात गृहमंत्री म्हणून हिंमत असेल, तर या ठाण्यातल्या बाजारबुणग्यांना आवरा. तुमच्या मनगटात खरंच स्वाभिमानी रक्त असेल, तर ठाण्यात जी बाजारबुणगेगिरी सुरू आहे तिला आवरा. ठाण्यात गृहमंत्रालयाचं राज्य आहे की नाही? फडणवीस ठाण्याचे गृहमंत्री आहेत की नाही?” असा सवाल संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

“पोलिसांना २४ तास घरी बसवा, मग…”

“एका नि:शस्त्र महिलेवर १०० महिला येऊन हल्ला करतात. पोलीस आयुक्तांनी काय बांगड्या भरल्या आहेत का? ठाण्यातले पोलीस गुंड टोळीत सामील झाले आहेत का? तुमचे पोलीस २४ तास घरी बसवा, मग हल्ले काय आहेत ते आम्ही दाखवू”, असा इशाराच राऊतांनी दिला आहे.

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण, राजन विचारे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत म्हणाले…

“हा भाजपाचा कट आहे. २०२४मध्ये जिथे भाजपा कमकुवत आहे, पराभूत शकते तिथे अशा दंगली होत आहेत. बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये दंगली होत आहेत. हे सरकारला शोभत नाही. देशाचे गृहमंत्री काल म्हणत होते की आमचं सरकार जेव्हा येईल, तेव्हा आम्ही दंगलखोरांना उलटं टांगू. मग आत्ताही तुमचंच केंद्रात सरकार आहे. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. तुम्ही कुणाची वाट पाहात आहात?” अशा शब्दांत संजय राऊतांनी अमित शाह यांनाही प्रश्न केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams devendra fadnavis cm eknath shinde on thane violence pmw
Show comments