ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी मयुर शिंदे याला अटक केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतचे मयुर शिंदे याचे छायाचित्र ट्विटर या समाजमाध्यमावर प्रसारित केले आहेत. तसेच आव्हाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिकाही केली आहे. मयुर शिंदे याच्या फेसबुक खात्यावर त्याचे भाजपचे नेते, ठाकरे गटातील आमदार सुनील राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत छायाचित्र आहे. त्यामुळे मयुर शिंदे याच्या अटकेनंतर ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. याप्रकरणात कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयुर शिंदे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याला यापूर्वीही ठाणे पोलिसांनी अटक केली होती. ठाण्यात वास्तव्यास असलेल्या मयुर शिंदे याचा दबदबा भांडुप, विक्रोळी भागात अधिक आहे. सुनील राऊत आणि मयुर शिंदे यांचे एकत्र छायाचित्रही विरोधकांनी आता समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यास सुरूवात केली आहे.
मयुर शिंदे याने यापूर्वी काहीकाळ भाजपमध्येही प्रवेश केला होता. त्याला नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्याची इच्छा होती. पंरतु भाजपने तिकीट नाकारल्याने त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, अशी चर्चा ठाण्यात होती. खासदार संजय राऊत यांना धमकी प्रकरणात मयूर शिंदे याला अटक झाल्यानंतर पुन्हा एकदा ठाण्यात मयुर शिंदे याच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मयुर शिंदे याच्या फेसबुक खात्यावर भाजप, राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे गटातील आमदार सुनील राऊत यांच्यासोबतची छायाचित्र दिसत आहेत. मयुर शिंदे याच्या अटकेनंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ट्विटरवरून टिका केली आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील गणेश चौकात वाहतूक पोलीस तैनात
‘कथित धमकी प्रकरणात अटक केलेला मयुर शिंदे हा ठाण्यातील एकमेव सज्जन नेत्याचाही (असे ते स्वत:ला समजतात हा!) खास माणूस आहे, हे म्हणत आहेत ते खरे आहे का ? अशी टिका त्यांनी केली. तसेच या मजकूरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आणि मयुर शिंदे याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. दुसऱ्या एका छायाचित्रामध्ये मयुर शिंदे याच्या जनसंपर्क कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि नाव आहे. तिसऱ्या एका छायाचित्रात त्याच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याची पत्रिका आहे. तर चौथ्या छायाचित्रात मयुर शिंदे याने राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या ते फलक आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचेही छायाचित्र आहे.