Sanjay Raut News Movie Eknath Shinde : “ठाण्यातील लोक फार चित्रपट काढू लागले आहेत. त्यामुळे ते (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री आहेत की चित्रपट निर्माते तेच आता कळत नाहीये. ते नेते आहेत की आणखी काय?” असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे आज (शनिवार, १० ऑगस्ट) शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच आगामी ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या निर्मितीवरून टोला लगावला.
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेजी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की सध्या ठाण्यातील लोक फार चित्रपट काढू लागले आहेत. ते मुख्यमंत्री आहेत की चित्रपट निर्माते झाले आहेत हेच कळत नाहीये. मलाही आता एक चित्रपट काढायचा आहे. मी काही चित्रपट काढले आहेत. मी विशेषतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट काढला आहे. मात्र मी खरे चित्रपट काढले आहेत. मी माझ्या चित्रपटातून लोकांना सत्य सांगितलं आहे. परंतु, राजन विचारेजी (शिवसेनेचे माजी खासदार) मलाही एक चित्रपट काढायचा आहे. ‘नमक हराम २’ असं त्या चित्रपटाचं नाव असेल. माझ्याकडे या चित्रपटाची संहिता लिहून तयार आहे.
संजय राऊत आक्रमक
ठाकरे गटातील खासदार म्हणाले, आधी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेजी तुम्ही सुद्धा वर्षानुवर्षे ठाण्यातील ज्या सापांना दूध पाजलं, त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच ठाण्यात आलो असतो. लोकसभा निवडणुकीत या सापांच्या शेपट्या वळवळत राहिल्या. आता विधानसभेत आम्ही त्यांचे फणे ठेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
हे ही वाचा >> ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांचा राडा, कारची काच फोडली, शेण व बांगड्या फेकत म्हणाले…
नमक हराम २ ची आम्हालाही प्रतीक्षा : उद्धव ठाकरे
दरम्यान, यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भाषणातून प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, “नमक हराम २ ची उत्सुकता आम्हालाही आहे, नागाचा अपमान मला करायचा नाही पण हे मांडूळ आहे, गांडूळ नाही, दुतोंडी मांडूळ. यांना फणा नाही. हे मोदींसमोर वळवळ करणारे मांडूळ आहे. हे (एकनाथ शिंदे) तिकडे लोटांगण घालतात. पँट तिकडे जाऊन खराब होत नाही, फोन आला की यांची पँट खराब होते. फोन आला की पळत सुटतात. नशीब पँट घातलेली असते.”