ठाणे : बदलापूर येथील शाळेतील विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याला मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणार्थ ठार केले होते. या घटनेत संजय शिंदे यांच्यासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री संजय शिंदे आणि हवालदार अभिजीत मोरे यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. तर उर्वरित दोघांवर रुग्णालयात अद्यापही उपचार सुरू आहेत.
हेही वाचा >>> शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांना जीवे मारण्याची धमकी
बदलापूर येथील लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला २३ सप्टेंबरला तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ठाण्यात चौकशीसाठी आणले जात होते. त्यावेळी पोलीस वाहनामध्ये मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, अमली पदार्थ विरोधी पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजीत मोरे आणि हरिश तावडे उपस्थित होते. वाहन मुंब्रा बाह्यवळण मार्गावर आले असता, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांची बंदूक हिसकाली. त्यावेळी मोरे यांच्या पायाला गोळी लागली. त्यामुळे संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याला गोळी झाडून ठार केले.
हेही वाचा >>> टेंभीनाका देवीच्या मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी, कोंडीत शाळेच्या बस अडकल्या
या घटनेनंतर विरोधकांकडून या चकमकीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजीत मोरे आणि हरिश तावडे यांच्यावर मागील काही दिवसांपासून ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना या पोलीस कर्मचाऱ्यांची महायुतीच्या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. गुरुवारी संजय शिंदे आणि अभिजीत मोरे यांना उपचार करून रुग्णालयातून सोडून देण्यात आले. तर निलेश मोरे आणि हरिश तावडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.