ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरातील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या बेकायदा बांधकामांवर हातोडा पडत असताना राजकीय अतिक्रमणेही जमीनदोस्त होऊ लागल्याने खडबडून जागे झालेल्या राजकीय नेत्यांनी अखेर महापालिकेच्या या मोहिमेविरोधात पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. कळव्याच्या नाक्यावर वर्षांनुवर्षे रस्ता अडवून उभे असलेले शिवसेनेचे कार्यालय म्हणजे या भागाची जणू ओळखच बनली होती. शिवसेनेचे या भागातील सर्वेसर्वा आनंद दिघे हयात असताना ठाण्याच्या टेंभी नाक्याला एक वेगळेच वलय प्राप्त झाले होते. तरीही कळव्याची ही शाखा मूळ शहरापलीकडे असलेल्या शिवसेनेच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कळव्यातील रस्ता रुंदीकरणासाठी या शाखेवर हात घातल्याने ठाणे, कळव्यात इतकी वर्षे सत्ताधारी म्हणून मिरविणाऱ्या शिवसेना नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे. या शाखेपाठोपाठ काल-परवा उभे राहिलेले स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयावर बुलडोझर चालवून अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईत सर्वाना समान न्यायाचे सूत्र कायम असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या दोन धक्क्यांमुळे हादरलेल्या राजकीय नेत्यांनी आता कळवा-मुंब््रयातील बाधितांचे प्रश्नावर जयस्वाल यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, हा राजकीय विरोध तापण्यापूर्वीच जयस्वाल यांनी व्यावसायिक पुनर्वसनाचे धोरण तयार करून पुन्हा एकदा राजकीय नेत्यांची कोंडी केली आहे.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात नमूद केल्याप्रमाणे प्रमुख रस्त्यांची रुंदी असावी, असा आग्रह जयस्वाल यांचा आहे. त्यामुळे सुरुवातीचे काही महिने स्मार्ट सिटीसारख्या योजनांच्या मागे लागलेले जयस्वाल यांनी गेल्या सहा महिन्यांपासून रुंदीकरणाच्या मोहिमेला हात घातला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जाणारे जयस्वाल आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची जोडी छान जमल्याने रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू असतानाही त्यास विरोध करण्यास फारसे कुणी धजावत नसल्याचे सध्या चित्र आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या बांधकामांवर मध्यंतरी महापालिकेने जोरदार कारवाई केली.
गुजराती, मारवाडी समाजातील व्यापाऱ्यांची लक्षणीय संख्या असलेल्या येथील बांधकामांवर हातोडा पडत असताना सत्ताधारी शिवसेनेने जाणीवपूर्वक स्वत:ला दुर ठेवण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीत येथील व्यापाऱ्यांचा मोठा टक्का भाजपच्या दिशेने झुकल्याची सल शिवसेना नेत्यांच्या मनात होती. त्यामुळे या कारवाईकडे त्रयस्थ नजरेने पाहण्यात शिवसेनेचे नेते दंग होते. पोखरण रस्त्याचे रुंदीकरण येथील नागरिकांनाच हवे आहे. त्यामुळे त्यास विरोध करण्याची धमक एकाही राजकीय पक्षाला दाखविता आली नाही. मात्र, कळव्यातील शाखेवर हातोडा पडताच ठाण्याचे महापौर आणि कल्याणचे खासदार खडबडून जागे झाले आहेत. याच भागात जितेंद्र आव्हाडांच्या कार्यालयावर आणि मुंब््रयातील बांधकामांवर कारवाई सुरू झाल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता आहेच. त्यामुळे बाधितांच्या खांद्यावर बंदूक ठेवत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राजीनाम्याचा इशारा दिला आणि येथील स्थानिक रोजगाराचा मुद्दा लावून धरला.
विकास हवा आहे अशी भूमिका घेत एका बाजूला संजीव जयस्वाल यांचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे बाधितांच्या बाजूने उभे राहत मोठय़ा मतपेटीला हात घालण्याची खेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खेळली आहे. उशिरा का होईना ही खेळी लक्षात आलेले शिवसेनेचे नेते सोमवारी जयस्वाल यांना भेटले. सेना नेते भेटण्यापूर्वीच या मुद्दय़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन जयस्वाल यांनी व्यावसायिक पुनर्वसनाचे धोरण आखले होते. त्यामुळे राजकीय दबावाला झुकून नव्हे तर स्वेच्छेने हे धोरण आखत असल्याचे चित्र जयस्वाल निर्माण करू पाहत आहेत. एका अर्थाने सत्ताधारी शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या दबावाला प्रशासन जुमानत नसल्याचा संदेश यानिमित्ताने देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अनेक वर्षांपासून उभी असलेली कळव्याची शाखा सत्ता असूनही पाडली गेल्याने शिवसेनेत कमालीची अस्वस्थता असताना बाधितांच्या पुनर्वसनाचे श्रेयही मिळत नसल्याने सत्ताधारी म्हणून पक्षाचे अस्तित्व काय, असा सवाल आता शिवसैनिकांचे पडू लागला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुनर्वसनाच्या मुद्दय़ावरून राजकारण तापत असताना भाजपचे नेते मात्र या घडामोडीत अस्तित्वहीन असल्यासारखे वावरताना दिसत आहे. एकूणच मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सोडल्या गेलेल्या जयस्वालस्त्राने ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सातत्याने घायाळ होत असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा