‘मी सहसा आजारी पडत नाही.. पण चार महिन्यांपूर्वी आजारी पडलो आणि सुट्टीवर गेलो. माझ्या आजारपणापेक्षा मी रजेवर जाण्याचीच चर्चा अधिक रंगली. प्रसारमाध्यमांनीही वेगवेगळे तर्कवितर्क लढविले. एक लक्षात घ्या.. मी आता आजारपणातून पूर्ण सावरून परतलो आहे. आयुक्त म्हणून ही माझी दुसरी इिनग आहे. त्यामुळे माझ्या उत्साहाला तोड नाही’.. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी सलग साडेतीन तासांच्या आपल्या भाषणात केलेल्या या स्फोटक फटकेबाजीमुळे सत्ताधारी शिवसेनेसह सर्वपक्षीय नगरसेवक अवाक् झाले आहेत.
आपल्या भाषणात आयुक्तांनी समूह विकास योजनेची लक्तरे वेशीवर टांगल्याने पालकमंत्री एकनाथ िशदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, महापालिका स्वखर्चातून संरचनात्मक परीक्षण करणार नाही, असेही त्यांनी ठासून सांगितल्याने शिवसेना नेत्यांना तर घाम फुटला आहे.
सहा महिन्यांपूर्वी महापालिकेत आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेना नेत्यांचे खटके उडाल्याची जाहीर चर्चा होती. फोर जी तंत्रज्ञानासाठी आवश्यक केबल टाकण्याच्या मुद्दय़ावरून जयस्वाल यांनी रिलायन्स समूहास तब्बल २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावून जयस्वाल यांनी शिवसेना नेत्यांची नाराजी ओढवून घेतली होती. आपला पहिला अर्थसंकल्प सादर करताना अतिशय सडेतोड पद्धतीने त्यांनी जुन्या कामांची लक्तरे वेशीवर टांगली. त्यामुळेच जयस्वाल यांनी मांडलेले दरवाढीचे प्रस्ताव शिवसेना नेत्यांनी तीन महिने बासनात गुंडाळून ठेवले. यामुळे संतापलेले जयस्वाल अचानक ४५ दिवसांच्या सुट्टीवर निघून गेले होते.
संरचनात्मक परीक्षण नाही
ठाणे शहरात सातत्याने इमारत कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे महापालिकेने ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्वखर्चातून संरचनात्मक परीक्षण करावे, अशी मागणी मध्यंतरी पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यासह प्रमुख शिवसेना नेत्यांनी केली होती. या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला होता. मात्र, एका इमारतीचे असे परीक्षण करण्यासाठी किमान २५ हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे सर्वच इमारतींचे परीक्षण करायचे झाल्यास काही हजार कोटी रुपये मोजावे लागतील, असा मुद्दा उपस्थित करत जयस्वाल यांनी ही शक्यताही सोमवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे या मुद्दय़ावरून मतांचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना जयस्वाल यांनी अंगावर घेतल्याचे चित्र पुढे आले आहे. यासंबंधी जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते बैठकीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले, तर महापौर संजय मोरे यांनी या विषयावर नंतर बोलू अशी प्रतिक्रिया दिली.