नवी मुंबईतील भाजप नेते आणि माजी खासदार संजीव नाईक यांना धनुष्यबाण चिन्हावर ठाणे लोकसभा निवडणुक लढाविण्याची ऑफर देण्यात आल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असून त्यावर आता संजीव नाईक यांनी प्रतिक्रीया देत शिवसेनेकडून कोणीही कोणतीही ऑफर दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. अनेकजण विचारत आहेत की, अजून उमेदवार जाहीर का झाला नाही. पण, जो खेळाडू रोज समुद्रात पोहतो, त्याला तरण तलावात जायची गरज नसते, असे सांगत उमेदवार लवकरच जाहीर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024: भाजपवर दबावासाठी शिंदे सेनेच्या दंड बैठका
भाजपचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक अथवा त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव यांच्यासाठी भाजपने या जागेवर दावा केला असून शिवसेनेकडूनही या जागेवर दावा करण्यात येत आहे. यातून या जागेच्या तिढ्याबाबत वेगवेगळ्या चर्चा पुढे येत आहेत. ही जागा मुख्यमंत्र्यांना सोडावी लागली तरी दोघांच्या सहमतीचा उमेदवार म्हणून संजीव नाईक यांनी धनुष्यबाण चिन्हावर हि निवडणूक लढवावी असा प्रस्तावही भाजपने मुख्यमंत्र्यांपुढे ठेवल्याची चर्चा आहे. त्यावर आता संजीव नाईक यांनी प्रतिक्रीया देत या चर्चा चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>> कल्याण लोकसभेसाठी इच्छुक ठाकरे गटाचे सुभाष भोईर, बाळ हरदास यांच्या शिवसैनिकांबरोबर भेटीगाठी
संजीव नाईक यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नाईक यांनी ठाणे लोकसभेच्या जागेबाबत मत व्यक्त केले. शिवसेनेकडून उमेदवारीबाबत कोणी आणि कुठलीही ऑफर दिलेली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल आणि त्याचा मोदीनी दिलेल्या अब की बार ४०० पार या नारानुसार निवडुण येणाऱ्या खासदारांमध्ये समावेश असेल, असेही नाईक यांनी सांगितले. उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहिती नाही. पण तो महायुतीचा उमेदवार असणार आहे. याबाबत वरीष्ठ नेतेमंडळी निर्णय घेणार आहेत. भाजपाची सर्व तयार झालेली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी याची रचना वेगळ्या पद्धतीच्या आहे. तिघांची रचना एकत्र करून महारचना तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच उमेदवार लवकरच निश्चित होईल. पण हा गड वेगळ्या पद्धतीने लढवला जाईल. गत निवडणुकीपेक्षा जास्तीत जास्त मतदान व्हावे असे शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष या तिघांनी मिळून ठरवलेले आहे, असेही ते म्हणाले.