डॉ. अशोक अकलूजकर यांचे मत
संस्कृत हस्तलिखितांचे जतन करणे गरजेचे आहे. परदेशात या भाषेतील दस्तऐवजांचे जतन केले जाते. ग्रंथ हे अनेक पिढय़ांचा वारसा आहेत. त्याचा अभ्यास करून आपण हा वारसा जपायला हवा. संस्कृत भाषा संगणकासाठी अतिशय उपयुक्त आहे. माध्यमांनी मोठय़ा प्रमाणावर त्याचा प्रसार केला आहे. या संदर्भात विविध स्तरावर अभ्यास सुरू आहे, असे मत इंग्लंड येथील संस्कृतचे प्राध्यापक डॉ अशोक अकलूजकर यांनी व्यक्त केले. डॉ. विजय बेडेकर यांनी संस्कृत विषयाचे प्रा. डॉ. अशोक अकलूजकर आणि डॉ. श्रीकांत बहुलकर यांच्याशी संवाद साधला.
परदेशी विद्यार्थी संस्कृत भाषा विजिगीषू वृत्तीने शिकतात. पाश्चिमात्य देशातील लोकांना संस्कृत भाषेविषयी आसक्ती व आदर आहे परंतु आपल्या देशातील लोकांमध्ये संस्कृतबद्दल प्रचंड अनासक्ती आहे अशी खंत डॉ. अशोक अकलूजकरांनी कार्यक्रमात व्यक्त केली. संस्कृत भाषा एकत्र बांधली गेलेली आहे, याची वेगवेगळी उदाहरणे देताना त्यांनी संस्कृत भाषेचे काव्य, शास्त्र आणि साहित्यात असलेल्या योगदानाविषयी सखोल माहिती दिली.
संस्कृत विषयाच्या संशोधनाविषयी बोलताना संस्कृतमध्ये विचार करायला सुरुवात करा हीच संशोधनाची खरी सुरुवात ठरेल, असे डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. संस्कृत हा विषय खूप गुण मिळवून देणारा आहे, अशा दृष्टिकोनातून या विषयाकडे विद्यार्थ्यांनी न पाहता संस्कृत विषयाच्या गोडीचा आस्वाद घ्या, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.