नाताळ सणासाठी वसईतील बाजारपेठा फुलल्या; विविध नवनवीन वस्तू बाजारात

नाताळ सणाचे खास आकर्षण म्हणजे सांताक्लॉज. आपल्या पोतडीतून लहान मुलांसाठी खाऊ आणून देणारा सांताक्लॉज बच्चे कंपनीचा खास लाडका. आता सांताक्लॉज बाहुल्यांच्या स्वरूपात मिळणार असून वसई-विरारमधील बाजारपेठांमध्ये बाहुल्याच्या स्वरूपातील विविध सांताक्लॉज आले असून ग्राहकांचीही त्याला पसंती मिळत आहे.

नाताळ सणानिमित्त वसई-विरारमधील बाजारपेठा फुललेल्या आहेत. विविध आकारांतील ख्रिसमस ट्री, कागदी कंदील, टोप्या बाजारात आल्या असून त्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. लहान मुलांचे आकर्षण लक्षात घेऊन यंदा सांताक्लॉजच्या बाहुल्या बाजारात आल्या आहेत. विविध आकारांतील या बाहुल्या ग्राहकांच्याही पसंतीच उतरत असून त्याची खरेदीही मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे वसईतील विक्रेत्यांनी सांगितले. ५० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत या सांताक्लॉजच्या किमती आहेत. सांताक्लॉजसह विविध प्रकारच्या मिठाई, केक बाजारात उपलब्ध आहेत. थर्माकॉल आणि प्लास्टिकला बंदी असल्यामुळे यंदा त्याचा उपयोग कुठेही दिसून येत नाही. जिलेटिन पेपरच्या साहाय्याने लहान भेटवस्तू तयार करण्यात आल्या आहेत.

विविध आकाराचे रंगबिरंगी कंदील बाजारात उपलब्ध आहेत. विविध स्वरूपातील चॉकलेट बॅग, नाताळसाठी म्युझिकल लाईट, टेबल क्लॉथ, ग्रीटिंग कार्ड्स, डोअर मॅट, वेलकम बॅनर, स्नो इफेक्ट, सींगिंग अ‍ॅण्ड डान्सिंग कॅप, रंगीबेरंगी मेणबत्त्या आदी अनेक गोष्टी बाजारात झळकत आहेत. ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी एलईडी लाइटच्या तोरणाची फार मागणी असल्याने तेही बाजारात उपलब्ध आहेत.

तयार गोठय़ांना मागणी

नाताळनिमित्त ख्रिस्तजन्माचा देखावा म्हणजे नाताळ गोठे तयार केले जातात. मात्र नाताळ गोठे तयार करण्यासाठी अनेकांना वेळ नसतो. ही गरज लक्षात घेऊन बाजारपेठांमध्ये तयार नाताळगोठे उपलब्ध आहेत. अगदी मध्यम आकारापासून मोठय़ा आकारातील नाताळ गोठे बाजारात दिसत आहेत. गोठे सजवण्यासाठी लागणारी सामग्रीही बाजारात उपलब्ध असून गेल्या वर्षीपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.

Story img Loader