ठाणे : सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आता सर्वत्र संतापची लाट उसळली आहे. मंगळवारी दुपारी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ‘वाल्मीक कराडला फाशी द्या’ अशी मागणी करत टेंभी नाका परिसरात आंदोलन केले. आंदोलकांनी वाल्मीक कराडचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केले.

सरपंच संतोष देशमुख यांची सुमारे तीन महिन्यांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली होती. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यासह काही जणांना अटक झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर सोमवारी रात्री काही छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित झाले आहेत. या छायाचित्रांमध्ये संतोष देशमुख यांचे अत्यंत वाईट पद्धतीने हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता सर्व राज्यभरामध्ये वाल्मीक कराडच्या फाशीची मागणी होत असून सर्वत्र आंदोलन केले जात आहे. ठाण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद आश्रम ते टेंभी नाका चौकापर्यंत पायी जाऊन वाल्मीक कराड याला फाशी देण्याची मागणी केली. त्यानंतर टेंभी नाका येथील चौकामध्ये वाल्मीक कराड याचा पुतळा जाळण्यात आला.

दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. वाल्मीक कराड याला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी शिंदे गटाने राज्यभर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाण्यात हे आंदोलन झाले आहे. या आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. कराड याचा पुतळा जाळल्यानंतर आंदोलन संपले.

सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आता सर्वत्र संतापची लाट उसळली आहे नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ‘वाल्मीक कराडला फाशी द्या’ अशी मागणी करत टेंभी नाका परिसरात आंदोलन केले

Story img Loader