ठाणे : गर्दीने कायम गजबजलेल्या आणि काँक्रीटच्या जंगलाचा घट्ट विळखा बसत असलेल्या मुंबई महानगर क्षेत्रातील पर्यटन स्थळांना आणि येथील सार्वजनिक सण उत्सवांना जागतिक पातळीवर पोहचविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘सप्तसुत्री’ असलेला पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये किनारा क्षेत्र, मनोरंजन, पर्यावरण, सांस्कृतिक वारसा स्थळे, प्रायोगिक, साहसी आणि अध्यात्मिक अशा सात घटकांना केंद्रस्थानी ठेऊन हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ठाणे विकास परिषदेत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील विविध पर्यटन क्षेत्रांना चालना मिळावी तसेच पर्यटन क्षेत्राचा विकास होऊन पर्यटकांची संख्या वाढून रोजगार उपलब्ध व्हावेत या दृष्टीने नुकतेच महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले होते. यामध्ये पर्यंटन क्षेत्रात गुंतवणूक वाढीबरोबरच, रोजगार उपलब्धी, पर्यटन स्थळांचा विकास काही ठिकाणी पर्यटन क्षेत्रांची उभारणी याबाबत उपायोजना आखण्यात आल्या होत्या. याच बरोबर सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या मात्र दुर्लक्षित असलेल्या पर्यटन स्थळांचा विकास करण्याबाबतच्या योजना आणि त्यासाठीच्या निधीची तरतूदही या धोरणात मांडण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून उल्लेख केलेल्या मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी अनेक महत्वकांक्षी प्रकल्पांची उभारणी करत असतानाचा या क्षेत्राला ‘पर्यटन हब’ म्हणून विकसित करण्यासाठी आरखडा तयार करण्यात आला आहे.

आणखी वाचा-उल्हासनगरमध्ये महिला पोलिसाला पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

आराखड्यात कसला समावेश?

पालघर, वसई, मरीन ड्राईव्ह आणि जुहू येथील सागरी किनाऱ्यांचा विकास करणे. सुमारे ३०० किमीच्या किनारपट्टीमध्ये प्रत्येकी १५ किमीच्या विभागात बोट फेरी पर्यटन विकसित करणे. तसेच मनोरंजन पर्यटनामध्ये चित्रपट सृष्टीचा अधिक प्रचार प्रसार करणे, मड आयलंड आणि अलिबाग येथील सागरी किनाऱ्यावर मनोरंजन केंद्र उभारणे. लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय प्रकल्प विकसित करणे तसेच विविध ठिकाणी संकल्प उद्यानांची उभारणी करणे. पर्यावरण पर्यटनामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नवी मुंबई तसेच ठाणे येथील खाडी पर्यटन, फ्लेमिंगो फेस्टिव्हल. तर सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले यांचा विकास करण्याबरोबर या स्थळांचा अधिक प्रचार प्रसार करण्यासाठी विविध महोत्सव भरविणे. तर प्रायोगिक पर्यटनामध्ये खारघर, मड आयलंड येथे गोल्फ कोर्स उभारणे, तसेच समुद्री किनारी विशेष उपाहारगृहांची उभारणी करणे यांसारख्या विविध गोष्टींचा सखल आढावा या विकास आराखड्यात मांडण्यात आला आहे.

आर्थिक उलाढाल वाढविण्याचे ध्येय

एमएमआर क्षेत्रातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देणारा पर्यटक सद्यस्थितीत सुमारे १ ते २ दिवसात ८ ते १० हजार रुपये पर्यटन स्थळांच्या भेटीसाठी खर्च करतो. भविष्यात पर्यटकांचा मुक्काम या क्षेत्रात किमान ३ ते ४ दिवस असावा आणि सुमारे २५ हजार रुपये इतका असावा असे उद्दिष्ट पर्यटन विभागाकडून ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा- Ovala Majiwada Sabha Constituency : उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार?

एमएमआर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास होतो आहे. याच बरोबर येथील पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी आणि विकासाबरोबरच हे क्षेत्र पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. याच दृष्टीने पर्यटन विकास आरखडा तयार करण्यात आला आहे. तसेच यामुळे रोजगाराला देखील चालना मिळणार आहे. -बी.एन.पाटील, संचालक, महाराष्ट्र पर्यटन संचालनालय

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saptasutri for tourism development in mmr sector detailed tourism development plan from directorate of tourism mrj