ठाणे – ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कोकण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “विभागीय, जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शन” आयोजित करण्यात आले आहे.

हे ‘सरस विक्री प्रदर्शन’ बुधवार, १२ मार्च ते रविवार, १६ मार्च या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात महिलांनी स्वतः बनवलेल्या विविध खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, कपडे आणि घरगुती वापराच्या विविध वस्तूंचे १७५ स्टॉल लावण्यात येणार आहे. त्यात, ३५० हून अधिक महिलांचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनात ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच इतर जिल्हयातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.महिलांच्या कर्तृत्वाला आणि मेहनतीला सलाम करण्यासाठी सरसच्या माध्यमातून जिल्ह्यातील बचत गटांना त्यांची उत्पादने दाखविण्याची आणि उत्पादनांच्या विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे. या विक्रीतून बचत गटांच्या महिलांना उत्पन्न मिळणार आहे.

या प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणेकरांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी केले आहे.

‘सरस’ महामेळ्याचे वैशिष्ट्य

या महामेळ्यात वैविध्य पाहायला मिळेल. हस्तकला, वस्त्रोद्योग, घरगुती वस्तू, मसाले, लोणची, पापड, आणि अनेक पारंपरिक पदार्थांचे या ठिकाणी स्टॉल्स असणार आहेत. या महामहामेळ्या च्या माध्यमातून महिलांनी स्वतः तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल. यामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल. तसेच या महामेळ्यात मनोरंजनासाठी खरेदीसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

Story img Loader