36वि द्यार्थ्यांच्या सर्वागीण वाढीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपक्रमशीलतेला प्राधान्य देत हसत-खेळत शिक्षण पद्धत कल्पकतेने राबवणारी शाळा म्हणून ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट पूर्वप्राथमिक विभागाने लौकिक प्राप्त केला आहे. या शाळेत पहिल्यांदा जेव्हा मुले प्रवेश करतात तेव्हा पालक आणि मुलाच्या हाताचा एकत्र ठसा आणि मुलाच्या उजव्या पायाचा ठसा शिक्षिका घेते. आणि त्यावर मग ‘शाळेचे पहिले पाऊल! तुमच्यासह मोठं होण्यासाठी’ असे लिहिले जाते. इथूनच शाळा आणि पालक यांच्या परस्पर सहकार्याने एकत्र वाटचालीला आश्वासक प्रारंभ होतो. जुन्या नव्याची सांगड घालीत वर्षभर सणउत्सव साजरे करताना बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. (दिव्याच्या आवसेला दिव्यांचे पूजन करताना प्रकाशाचे महत्त्व, वीज का वाचवायची हे सोप्या भाषेत समजावले जाते)

एप्रिल महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षांच्या अभ्यासक्रमाची आखणी केली जाते. वाचनपूर्व तयारी, तुलना, वर्गीकरण, स्वत:ची ओळख, ज्ञानेंद्रिये, क्रमवारी, आकार अशा तऱ्हेने वर्षभराचा अभ्यासक्रम ठरवला जातो. कोणतीही संकल्पना विविध खेळ, गाणी, गोष्टी, वस्तू अशा माध्यमांच्या साहाय्याने मुलांना सामावून घेऊन स्पष्ट केली जाते. आकार, रंग, गणनपूर्व संकल्पना या सप्ताहात साजऱ्या होतात. आठ दिवस आहार सप्ताह घेतला जातो. मुले डब्यात फळभाज्या, पालेभाज्या, कंद, कडधान्ये असे घेऊन येतात. या वर्षी पत्त्यांचा वापर करून बालकांसाठी अक्षरचित्रे कार्डे तयार करण्यात आली (अक्षरओळख, दशक संकल्पना यासाठी उपयुक्त). त्यामुळे प्रत्येक मुलाकडे अक्षरअंक असे पत्ते आणि त्यापासून खेळही तयार झाले.
लहान वयातच मुले पुस्तकांशी जोडली जावीत म्हणून सुरू झालेले बालवाचनालय, खेळांची लायब्ररी (जी पालक प्रतिनिधी चालवतात), पालकांना मार्गदर्शनपर पुस्तकांची पालक-शिक्षक संघ लायब्ररी असे उपक्रम येथे राबवले जातात. प्रयोगशीलतेची परंपरा जोपासत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या शाळेने ई-लर्निगच्या माध्यमातून यशस्वीपणे केला आहे. गेली चार वर्षे टप्प्याटप्प्याने शिशुवर्गासाठी ई-लर्निग हे माध्यम कल्पकतेने वापरले जात आहे. अगदी सुरुवातीला मुलांना शैक्षणिक सीडीज दाखवल्या जात असत. त्यानंतर गेल्या वर्षीपासून विविध गणनपूर्व संकल्पना आणि अक्षरओळख यासाठी ‘पॉवरपॉइंट’ सादरीकरणाचे माध्यम वापरले जाते.
शाळेच्या मुख्या. रती भोसेकर यांनी तयार केलेल्या या ‘पॉवरपॉइंट स्लाइड’च्या माध्यमातून गणनपूर्व संकल्पना अतिशय चांगल्याप्रकारे स्पष्ट करता येतात, असा त्यांचा अनुभव आहे. सर्व मुले एकाग्रतेने पाहतात आणि शिकवणं अधिक परिणामकारकरीत्या होते व मुले त्यामुळे त्याच्याशी लवकर जोडली जातात, वर्गात आधी वस्तूंच्या हाताळणीतून, संवादातून लहान-मोठा, कमी-जास्त इ. गोष्टी स्पष्ट केल्या जातात. पुढे मग दृक्श्राव्य माध्यमाची जोड दिल्याने त्याचे दृढीकरण अधिक चांगल्या प्रकारे होते. संख्याचिन्हाची ओळख मुलांना करून देण्यासाठी वेगळी पॉवरपॉइंट स्लाइड तयार करण्यात आली आहे. पहिल्यांदा मुलांना वस्तूंच्या हाताळणीतून १, २ असे समजावले जाते. मग मुले पडद्यावर एक-एक चित्र येताना पाहतात. उदा. १ झाड, १ फूल, १ विमान, १ घर इ. आणि मग १ हे संख्याचिन्ह येते. अशातऱ्हेने संकल्पना स्पष्ट होते. शून्य संकल्पना स्पष्ट करताना पाच चिमण्यांचे गाणे (जे मुलांच्या परिचयाचे आहे.) या स्लाइडमधून मुले पाहतात आणि ती पटकन जोडली जातात. वस्तू हाताळताना काही वेळा ते दुर्लक्ष करतात, पण ई-लर्निगमध्ये ते खऱ्या अर्थाने एकरूप होतात, स्वत: ते पाहताना बोलतात आणि त्यामुळे ते परिणामकारक होतं. मुलं ५ चिमण्यांतली १ उडून गेली की राहिल्या ४ हे स्वत: म्हणतात आणि अशा तऱ्हेने सगळ्या उडून गेल्या की राहिल्या शून्य म्हणजे काहीच नाही हे त्यांना समजायला सोपे जाते. अक्षरओळख संकल्पनेच्या वेळी ‘म’ अक्षर असेल, तर मुलांच्या परिचयाचे ‘म’चे शब्द चित्रासहित (माकड, माळ इ.) एकामागून एक येतात आणि मग मुले सर्वात शेवटी ‘म’ हे मुळाक्षर पाहतात. शब्दांची ओळखच्या (वाचनपूर्व तयारी) वेळी पडद्यावर कमळाचे चित्र येते. क, म, ळ ही अक्षरे विखुरलेली असतात. मग ती क्लिक करून वेगवेगळ्या क्रमाने दाखवली जातात. ळमक, मळक आणि मग ह्य़ापासून कमळ शब्द तयार होतो का? असे संवादातून समजावले जाते. थोडक्यात डावीकडून उजवीकडे वाचणे (जे पुढे वाचनासाठी, गणितातील समीकरण सोडवण्यासाठी उपयोगी पडते.) यासाठीचा पायाही तयार होतो. वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची परंपरा माजी मुख्याध्यापिका रोहिणी रसाळ यांच्याप्रमाणे सध्याच्या मुख्याध्यापिका रती भोसेकरही जोपासत आहेत.

Story img Loader