Mira Road Murder : मीरा रोड या ठिकाणी झालेल्या भयंकर हत्येने महाराष्ट्र हादरला आहे. मनोज साने या माणसाने त्याच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. त्यानंतर तिचे तुकडे तुकडे केले. सरस्वती असं त्याच्या लिव्ह इन पार्टनरचं नाव होतं. सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करुन मनोजने ते भाजले, मिक्सरमध्ये बारीक केले, कुकरमध्ये शिजवले. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी मनोजने केल्या. अशात या दोघांनी लग्न केलं होतं अशीही माहिती समोर आली आहे. सरस्वती आणि मनोज साने या दोघांनी एका मंदिरात लग्न केलं होतं. मात्र हे लग्न या दोघांनी समाजापासून लपवून ठेवलं होतं. या दोघांनी लग्न लपवलं? या प्रश्नाचं उत्तर आता पोलिसांनी दिलं आहे.
काय म्हटलं आहे पोलिसांनी?
डीसीपी जयंत बजबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सरस्वती ३२ वर्षांची होती. मनोज साने ५६ वर्षांचा आहे. हे दोघं लिव्ह इन पार्टनर असल्याचं समोर आलं होतं. मात्र चौकशी दरम्यान आम्हाला हे समजलं की सरस्वती आणि मनोज साने यांनी लग्न केलं होतं. सरस्वतीच्या बहिणींनाही या लग्नाची माहिती मनोजने दिली होती. मात्र आपलं लग्न झालं आहे ते समाजापासून त्यांनी लपवून ठेवलं होतं कारण मनोज आणि सरस्वती या दोघांमध्ये वयाचं बरंच अंतर होतं.”
मनोज साने आणि सरस्वती या दोघांचं लग्न झालं होतं अशीही माहिती आता समोर आली आहे. एका मंदिरात सरस्वती आणि मनोजने लग्न केलं होतं. ज्या अनाथ आश्रमात सरस्वती वाढली त्या अनाथ आश्रमात सरस्वतीने मनोजची ओळख माझा मामा अशी करुन दिली होती. सरस्वतीला आणखी चार बहिणी होत्या. या सगळ्या बहिणी अनाथआश्रमातच राहिल्या. पाच बहिणींमध्ये सरस्वती ही सर्वात लहान होती. या सगळ्यांची आई त्या लहान असतानाच वारली तर वडील त्यांच्यापासून वेगळे झाले होते.
रेशनच्या दुकानात मनोज आणि सरस्वती यांची ओळख झाली
रेशनच्या दुकानात सरस्वती आणि मनोजची ओळख झाली. सरस्वतीशी त्याची ओळख झाली त्यानंतर मनोजने तिचा विश्वास संपादन केला. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी मंदिरात लग्न केलं होतं. मात्र दोघांच्या वयात भरपूर अंतर होतं. त्याचमुळे या दोघांनी लग्न लपवलं होतं. त्यानंतर ही हत्या उघड झाली, तेव्हा पोलिसांना भयंकर दृश्य घरात दिसलं. मनोजने घरात सरस्वतीच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले होते. त्यातले काही तुकडे गॅसवर भाजले, काही तुकडे शिजवले तर काही मिक्सरमध्ये बारीक केले. पोलिसांना घरात गेल्यानंतर बादल्या आणि पातेल्यांमध्येही मृतदेहांचे तुकडे केल्याचं दिसून आलं.