ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ठाण्यातील कर्करोग रुग्णालयाच्या पायाभरणी सोहळय़ासाठी सरसंघचालक मोहन भागवत रविवारी ठाण्यात येणार आहेत. बाळकुम येथे ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इमारतीच्या परिसरात धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमिपूजन केले जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित राहाणार आहेत.
ठाणे शहरात कर्करोग रुग्णालय असावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रयत्न सुरू केले होते. बाळकुम येथे महापालिकेने उभारलेल्या इमारतीत या रुग्णालयाच्या उभारणीस शासनानेदेखील मंजुरी दिली होती. या इमारतीस लागूनच कर्करोग रुग्णालयासाठी विस्तारित संकुलाची उभारणी केली जाणार असून या कामाचे भूमिपूजन भागवत यांच्या हस्ते होणार आहे.
या रुग्णालयाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले असून या रुग्णालयाच्या परिसरात त्रिमंदिर संकुलही उभारण्यात येणार आहे. या भूमिपूजन सोहळय़ास दादा भगवान फाऊंडेशनचे दीपक देसाई, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह मंत्री आणि नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
बाळकुम येथील रुस्तमजी गृहसंकुलामधील ठाणे महापालिकेच्या टाऊन सेंटरच्या जागेत कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे. भूखंड जितो एज्युकेशनल अँड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल या संस्थांच्या माध्यमातून ठाणे महापालिका हे रुग्णालय उभारणार आहे.
वाहतूक बदल..
- या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून साकेत, बाळकूम भागात ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.
- साकेत येथून बाळकूम मार्गे कशेळीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना महालक्ष्मी मंदिर येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने महालक्ष्मी मंदीर येथून मुंबई नाशिक महामार्गाने इच्छितस्थळी जातील.
- कशेळी येथून बाळकूम ग्लोबल रुग्णालयाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना बाळकूम नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी चौकातून वाहतूक करतील.
- माजीवडा गाव येथून ग्लोबल रुग्णालयमार्गे साकेतच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना लोढा संकुल येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने लोढा संकुल येथून डावीकडे वळण घेऊन बाळकूम येथे जातील.