साठेवाडा, कल्याण
वाडा ही संकल्पना चार भिंतींपासून तयार झालेल्या वास्तुपुरती मर्यादित ठेवता येणार नाही. वाडय़ातील प्रथा, परंपरा, कुटुंबीयांचे वाडय़ाशी निगडित असणारे ऋणानुबंध अशा विविध गोष्टींच्या संगमातून वाडा ही संकल्पना उदयास येते. अशा प्रकारच्या ‘वाडा’ या संकल्पनेचे उत्तम उदाहरण म्हणजे कल्याणातील साठेवाडा होय. १४१ वर्षे जुना असलेला आणि पोर्तुगीज वास्तुकलेची साक्ष देणारा कल्याणातील साठेवाडा त्याच्या अनेक अर्थाने वैशिष्टय़पूर्ण आहे. कल्याण आणि परिसरातील इतिहासाच्या वास्तुखुणांचा तपशील चाळत असताना साठेवाडय़ाचा उल्लेख आवर्जून करावा लागतो.

१८७५ मध्ये सदाशिव मोरेश्वर साठे यांनी कल्याणचे सुभेदार कै. रामाजी महादेव बिवलकर यांच्याकडून वाडय़ाची जमीन विकत घेतली. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी एक भली मोठी वास्तू उभी केली. त्या काळात या वास्तूचे वेगळेपण निश्चितपणे लोकांच्या नजरेत भरणारे होते. जे आजच्या काळातही वाडा पाहणाऱ्यास जाणवते. कल्याणमध्ये साठेवाडय़ाच्याही शे-दोनशे वर्षे आधीपासून अनेक वाडे होते. अगदी साठेवाडय़ाशेजारी असणारा सुभेदार बिवलकरांचा वाडाही साठेवाडय़ाच्या शंभर वर्षे आधी बांधला होता. काळे, फडणीस, सुळे, जोशी यांचे वाडे तर सुभेदार वाडय़ापेक्षाही जुने म्हणून ओळखले जात असत. हे वाडे पेशव्यांच्या कारकीर्दीमध्ये ठिकठिकाणच्या कर्तबगार मराठी मंडळींकडून बांधण्यात आले. पुणे, सातारा, नाशिक, वाई आदी गावांमध्ये अद्यापही ‘वाडा’ या स्वरूपात काही वास्तू उभ्या आहेत. काळाच्या ओघात काही वाडय़ांचे मूळ स्वरूप खूप बदलले. काही वाडय़ांचा आता निवासीऐवजी दुसऱ्या काही प्रकारासाठी म्हणजे शाळा, कार्यालये इत्यादीसाठी वापर सुरू झाला. त्यानुसार त्यांचे बाह्य़ रूपही बदलले.
जुन्या कल्याणातील गांधी चौक परिसरात असणाऱ्या आगलावे आळीशेजारील बोळीत साठेवाडा आहे. साठेवाडय़ात प्रवेश करताना समोरच भला मोठ्ठा दिंडी दरवाजा आपल्या नजरेस पडतो. वाडय़ाचा हा दिंडी दरवाजा सागवानी लाकडापासून तयार झाला असून त्यावर नक्षीकाम केलेले आढळते. विशेष बाब, म्हणजे साठेवाडय़ातील सगळ्यात खर्चीक गोष्ट म्हणजे दिंडी दरवाजा होय. हा दिंडी दरवाजा उभा करण्यासाठी त्या काळी २०० रुपये किंमत मोजावी लागल्याचे, साठे कुटुंबीय आवर्जून सांगतात. बारा फूट उंच आणि सात फूट रुंद असणाऱ्या या दिंडी दरवाज्याला पोट दरवाजाही करण्यात आला आहे. साठेवाडय़ात प्रवेश करताना या पोट दरवाज्यातून मान वाकवून आत यावे लागते. िदडी दरवाज्यातून आत आल्यानंतर पुढचे अंगण लागते. या अंगणात उभे राहिल्यानंतर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला आणि समोर सर्वत्र आपल्याला वाडय़ाचा परिसर पाहावयास मिळतो. त्यामुळे नक्की वाडय़ाचा कोणता भाग प्रथम पाहायचा या संभ्रमात वाडा पाहायला आलेला प्रत्येक माणूस पडतो. साठेवाडय़ाचा प्रत्येक भाग आपल्याला काही तरी आठवणी सांगू इच्छितो की काय, असा भास आपल्याला वाडय़ात वावरताना होतो. पुढच्या अंगणाचेच घ्यायचे झाल्यास, हे अंगण पूर्वी फुलझाडांनी बहरलेले असे. उन्हाळ्याच्या दिवसात येथे पापड, कुरडया, गहू, डाळ अशा वाळवणांनी भरलेले पाहायला मिळत असे. त्याचप्रमाणे अंगणाचा हा परिसर कधी काळी मुलींच्या भोंडल्यात तर कधी वाडय़ातील लहानग्यांच्या विटी-दांडूच्या खेळात सहभागी होत असे. साठेवाडा मुख्यत: तीन भागांमध्ये विभागलेला आहे. पुढच्या अंगणातून समोरच्या बाजूला पाहिल्यास वाडय़ाची मूळ वास्तू आपल्या नजरेस पडते. वाडय़ाच्या डाव्या बाजूस पूर्वीच्या काळी धान्याची कोठारे होती तर उजव्या बाजूस गोठा होता. या दोन्हीचे रूपांतर घरांमध्ये करण्यात आले आहे. वाडय़ाच्या मूळ वास्तूत १९७०-७५ पर्यंत एकत्र कुटूंब पद्धतीत साठे कुटुंबीय राहात असत. त्यानंतर वाडय़ातील प्रत्येकाने वाडय़ाच्याच भागात आपापली घरे विकसित केली. त्यामुळेच साठे वाडय़ात जुने बांधकाम आणि आधुनिक बांधकाम यांची सांगड घातली गेल्याचे पाहायला मिळते. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार भाऊ साठे यांना मिळाले. हा पुतळा १८ फूट उंचीचा साकारायचा असल्याने त्या काळी २५ फूट उंचीचा स्टुडिओ उभारण्याची आवश्यकता साठे यांना भासली. त्यामुळेच वाडय़ाच्या एका भागात १९५९ मध्ये स्टुडिओ उभा करण्यात आला. या स्टुडिओत आजही आपल्याला भाऊ साठे यांनी साकारलेले अनेक पुतळे पाहायला मिळतात. २६ जानेवारी १९६१ मध्ये गेट वे ऑफ इंडिया येथे भाऊ साठे यांनी साकारलेला १८ फूट उंचीचा घोडय़ावर स्वार असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला.
साठेवाडय़ात सण-समारंभही मोठय़ा उत्साहात साजरे केले जात असत. वाडय़ातील गणेशोत्सव हा त्यापैकीच एक. साठेवाडय़ात गेल्या १४० वर्षांपासून अव्याहतपणे गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जात आहे. झांजा-शंखांच्या गजरात छोटीशी मिरवणूक काढून दिंडी दरवाजातून श्रीगणेशाचे वाडय़ात आगमन होते. वाडय़ातील दिवाणखान्यात श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. पेशवेकालीन तख्तपोशीवर टांगलेले पाच फुटांचे बिलोरी झुंबर, त्याच्या दोन्ही बाजूला दोन छोटी झुंबरं, १२ हंडय़ा अशा सजावटीने दिवाणखान्याला एक वेगळेच रूप प्राप्त होते. ४० फूट लांबीचा असणारा हा दिवाणखाना गणेशोत्सवातील सजावटीमुळे उजळून निघतो. सर्वात नवलाची आणि ऐश्वर्य संपन्नतेची साक्ष देणारी वस्तू म्हणजे अध्र्या दिवाणखान्याला व्यापणारा ‘रूजामा’! या रूजाम्यावर पांढरी शुभ्र अखंड चादर, आसपास पेशवाई थाटाचे लोड तक्के! अशी रुबाबदार पेशवाईची आठवण करून देणारी बैठकही गणेशोत्सवाच्या निमित्ताने साठेवाडय़ात पाहावयास मिळते. वाडय़ात गुढी पाडव्याचाही सण मोठय़ा
उत्साहात साजरा केला जातो. गुढी पाडव्यासाठी शेतावरून दरवर्षी नवी कोरी उंचच उंच बांबूची काठी घरात आणली जाई. आता शेतं गेली, तरी गुढीच्या काठीची सजावट मात्र सुटली नाही. आजही तितक्याच उत्साहात गुढी पाडव्याचा उत्सव वाडय़ात साजरा केला जातो.
साठेवाडय़ात सध्या २५ कुटुंबे राहतात. शांताबाई दत्तात्रय साठे या सर्वात ज्येष्ठ. त्या १०३ वर्षांच्या असून गेल्या ८५ वर्षांपासून त्या या वास्तूत वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र ज्येष्ठ शिल्पकार सदाशिव (भाऊ) साठे, वामनराव साठे, रमेश साठे, श्रीनिवास साठे आणि कुटुंबीय यांचे वास्तव्यही वाडय़ात आहे. साठेवाडय़ात साठे यांची सहावी पिढी गुण्यागोविंदाने नांदत आहे. साठेवाडय़ात पोर्तुगीज वास्तुकलेचे दाखले देणारे नमुनेही आढळून येतात. साठेवाडय़ातील खिडक्या आठ फूट लांब तर चार फूट रुंद आकाराच्या आहेत. या खिडक्यांना चार दरवाजे आहेत. यावरूनच या खिडक्यांचे आकारमान चटकन आपल्या डोळ्यासमोर उभे राहू शकेल. वाडय़ातील घरांचे सर्व दरवाजे ७.५ फूट लांबीचे आहेत.
साठेवाडय़ाने नृत्य, नाटय़, गायन, शिल्प अशा विविध कलांना जन्म दिला. साठे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांनी ‘जॉली सोशल क्लब’ या नावाने एक क्लब सुरू केला होता. त्याचेच पुढे रूपांतर ‘कल्याण गायन समाज’ या संस्थेमध्ये झाले. १९३८ मध्ये कल्याण गायन समाजाची स्वत:ची वास्तू उभी राहीपर्यंत अंदाजे सहा ते सात वर्षे गाण्याची मैफल साठेवाडय़ातील दिवाणखान्यात होत असे. यानिमित्ताने वाडय़ामध्ये हिराबाई बडोदेकर, मास्टर कृष्णराव, वझेबुवा, पं. रविशंकर यांसारखी कित्येक मान्यवर मंडळी येऊन गेली. २५ मे १८७५ रोजी वाडय़ाची वास्तुशांत मूळ पुरुष कै. सदाशिव मोरेश्वर साठे यांनी केली होती. त्या ऐतिहासिक व अभिमान वाटावा अशा क्षणाला १९७५ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने वाडय़ात लग्नसमारंभ असल्यासारखा भव्य उत्सव साजरा करण्यात आला होता.
समीर पाटणकर

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…