सत्यम शिवम सुंदरम, कात्रप, बदलापूर (पूर्व)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वाद नाही अशी सोसायटी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यात कचरा, पाणी, स्वच्छता, शांतता, सांस्कृतिक कार्यक्रम, एकोपा अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी सापडाव्यात अशी सोसायटी म्हणजे बदलापूरमधील सत्यम, शिवम, सुंदरम..
बदलापुरातील नव्याने विकसित झालेला आणि तरुणाईच्या सर्वाधिक पसंतीचा म्हणून ओळखला जाणारा भाग म्हणजे कात्रप. शहरातील महत्त्वाची आस्थापने, दुकाने, शोरूम, हॉटेल्स आणि व्यापारी संकुलेही याच ठिकाणी आहेत. त्यामुळे सर्वाधिक वर्दळीचा भाग म्हणूनही कात्रपची ओळख आहे. कर्जतला जाणारा जव्हार-खोपोली महामार्गही याच भागातून जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या भागात अनेक गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यातीलच एक गृहसंकुल म्हणजे सत्यम शिवम सुंदरम. तीन इमारतींच्या मिळून बनलेल्या या सोसायटीत एकूण ४० सदनिका आहेत. त्यात जवळपास दोनशे रहिवासी राहतात. एरवी अपार्टमेंट संस्कृतीत अभावाने आढळणारी ऐसपैस जागा येथे आढळते. रहिवासी बहुतेक मराठी भाषक आहेत. त्यात काही हिंदी भाषकांचाही समावेश आहे. त्यामुळम्े विविध संस्कृतींचा येथे संगम पहायला मिळतो. आपल्या परंपरा आणि संस्कृती जपत येथे अनेक सण साजरे केले जातात. त्यासह प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनही मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथे स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात येते. यावेळी विविध स्पर्धामधून संकुलातील लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यात येतो. त्यामुळे संकुलातील ज्येष्ठांसह तरुण आणि महिलांमध्येही एक प्रकारचा संवाद निर्माण होऊन एकता वाढीस लागते असे संकुलातील ज्येष्ठ नागरिक सांगतात.
मोठे गृहसंकुल म्हटले की दिवसागणिक त्यात समस्या वाढत जातात. बदलापूर शहर गेल्या काही दिवसात प्रचंड वेगाने वाढत असून त्याचा फटकाही पायाभूत सुविधांवर पडताना दिसतो. मात्र अद्याप तरी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या बदलापूर शहराला पाणीटंचाईच्या तशा झळा बसल्या नाहीत. मात्र तरीही सत्यम शिवस सुंदरमने स्वत:साठी पर्यायी व्यवस्था करून ठेवली आहे. सोसायटीच्या आवारात एक जुनी विहीर आहे. त्याचा वापर करून सोसायटीने जलसाक्षरतेचा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे. सोसायटीतील प्रत्येक सदस्याकडून वर्गणी काढून तिन्ही इमारतंींवर पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोसायटीला सहसा पाणीटंचाई भेडसावत नाही. त्यामुळे पाण्यावरून सोसायटीत होणारी वादळेही उद्भवत नाहीत. पाण्याच्या समस्येसोबत सोसायटीतील रहिवाशांनी
एकतेतून इतर अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. पाण्याबरोबरच त्यांनी सोसायटीतील कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे दरुगधी, अस्वच्छता, कचऱ्यावर येणारी भटकी कुत्री आदी समस्या सोसायटीला भेडसावत नाहीत.
बदलापूर शहर हे निसर्गसंपन्न वातावरणासाठी ओळखले जाते. शहरात ठिकठिकाणी असलेली गर्द हिरवी झाडे अजूनही त्याची साक्ष देतात. मुख्यत: याच कारणामुळे एक तपापूर्वी चाकरमान्यांचा आणि मध्यमवर्गीयांचा या शहराकडे येण्याचा कल वाढला आहे. अनेक रहिवासी संकुलांमध्ये उद्यानांची सुविधा आहे. मात्र सत्यम शिवम सुंदरममध्ये उद्यान नाही. मात्र येथे असलेल्या झाडांमुळे येथील उद्यानाची कमतरता भरून निघाली आहे. या झाडांमुळे संकुलाच्या आवारात हवा खेळती राहण्यास मदत होते. शुद्ध हवा उपलब्ध झाल्याने इतर पर्याय शोधण्याची रहिवाशांना गरज पडत नाही. वाढत्या नागरीकरणामुळे लहान मुलांचे मैदानी खेळ बंद झाले आहेत. त्यामुळे अनेकदा काँक्रिटच्या खेळपट्टय़ांवरच मुलांना खेळावे लागते. मात्र संकुलातील ऐसपैस जागेमुळे लहान मुलांनाही खेळण्याची चांगली जागा उपलब्ध झाली आहे.
त्यामुळे प्रत्येक वेळी मुलांना मैदान गाठण्याची गरज पडत नाही. मोकळ्या आणि ऐसपैस जागेमुळे येथे दिवसभर प्रकाशही चांगला असतो. संकुलात सायंकाळी प्रकाश कायम राहावा यासाठी येथे एलईडी विजेच्या दिव्यांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे विजेची बचतही होते.
सुरक्षेच्या दृष्टीनेही सोसायटीने पावले उचलली असून तिन्ही इमारतींच्या प्रथमदर्शी प्रवेशद्वारांवर आणि आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच अतिरिक्त सुरक्षारक्षकांची नेमणूक सोसायटीच्या सुरक्षेच्या भिंती आणखी भक्कम करतात. त्यामुळे येथे सुरक्षेच्या बाबतीतही पुरेसी काळजी घेतल्याचे दिसते.
बाहेरच्या समस्यांचा जाच
आपले वैशिष्टय़पूर्ण उपक्रम आणि कामांमुळे चर्चेत असलेल्या सत्यम शिवम सुंदरम या रहिवासी संकुलाला विविध समस्यांनाही सामोरे जावे लागते आहे. संकुलाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता अनेकदा खराब होत असतो. त्याची तात्काळ दुरुस्ती आणि काळजी राखण्यासाठी अनेकदा संकुलातील रहिवासी प्रशासनाकडे मागणी करत असतात. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज रहिवासी व्यक्त करतात. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराबाहेर आणि परिसरात खाद्याच्या गाडय़ा आणि दुकाने अधिक असल्याने अनेकदा या उरल्यासुरल्या अन्नावर पोसले जाणारे अनेक भटके कुत्रे येथे आहेत. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. यावर उपाययोजना करण्याचीही मागणी येथील रहिवासी करतात.
विकासकामात एकता
सोसायटीतील अंतर्गत कामांबाबत अनेकदा विविध मतप्रवाह पहायला मिळत असतात. मात्र सत्यम शिवम सुंदरम रहिवासी संकुलात विकासकामांना कधीही विरोध होत नसल्याचे अध्यक्ष श्रीकांत बोरकर सांगतात. अशा कामांसाठी रहिवासी पाठिंबाच देत असतात. त्यामुळे कामात अडथळा निर्माण होत नाही, असे नितिन जगताप सांगतात.