नाटय़गृहाच्या समिती बैठकीत रंगली चर्चा

डोंबिवलीतील सावित्रीबाई नाटय़गृह पुन्हा एकदा लग्नसमारंभासाठी खुले करून देण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. प्रेक्षक आणि नाटय़कर्मीसाठी असुविधांचे आगार ठरलेले हे नाटय़गृह महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरू लागले आहे. पुरेशा प्रमाणात नाटय़प्रयोग होत नसल्याने येथील व्यवहार तोटय़ात चालतो, अशी चर्चाही आहे. असे असताना लग्नसोहळे इतर समारंभासाठी नाटय़गृहाचे दरवाजे पुन्हा खुले करून देण्याचा विचार व्यवस्थापनाने सुरू केला आहे.

नाटय़गृहातील विकासकामांसाठी महापालिकेने एक विशेष समिती तयार केली असून या समितीची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ही चर्चा पुढे आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महापालिकेने उभारलेले सावित्रीबाई फुले नाटय़गृह हे मूळ शहरापासून दूर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नाटय़प्रयोगाचा आस्वाद लुटण्यासाठी जाणाऱ्या रसिकांची संख्याही दिवसागणिक कमी होत आहे. डोंबिवली शहर ते नाटय़गृहाच्या मार्गावर कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेची विशेष बस व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी रसिकांकडून सातत्याने जोर धरत आहे. मात्र, एखाद् दुसरा अपवाद वगळला तर अशी ठोस बस व्यवस्थाही नसल्याने शहरातून या ठिकाणी जाणे खर्चीक बनले आहे. याशिवाय नाटय़गृहात उपाहारगृहाची व्यवस्था नाही. येथे मिळणारे खाद्यपदार्थ हे कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर या नाटय़गृहातून आणले जातात. यासारख्या अनेक सोयी-सुविधांची या ठिकाणी वानवा आहे. या असुविधा दूर करण्यासाठी महापालिकेने सावित्रीबाई नाटय़गृहासाठी एका वेगळ्या समितीची नेमणूक केली आहे. नाटकांना जास्तीत जास्त न्याय मिळावा तसेच नाटय़गृहाची देखभाल करणे हा या समितीचे मुख्य उद्देश आहे. मात्र नुकत्याच झालेल्या समितीच्या एका बैठकीत नाटय़गृहाचे उत्पन्न कमी असल्याने लग्नसमारंभासाठी ते खुले केले जावे, अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाल्याने यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नाटय़प्रयोग की लग्नकार्य?

सावित्रीबाई फुले नाटय़गृहात प्रयोगांसाठी निर्मात्यांना तीन महिने आधी तारखा दिल्या जातात. लग्नकार्ये साधारपणे सहा महिने आधी ठरत असतात. या वाटय़गृहात वधु-वर मेळावेही आयोजित केले जातात.हे नाटय़गृह कार्यक्रमांना उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे लग्नकार्यासाठी नाटय़गृह खुले करावे अशी चर्चा करण्यात आली.

कलाकारांसाठी तालीम सभागृह कमी पैशांमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तसेच प्रायोगिक, बालरंगभूमी तसेच इतर नाटकांचेही तिकीट दर वाढवणार नाही. त्यामुळे उत्पन्नासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे; लग्नासाठी नाटय़गृह देणे अशी चर्चा बैठकीत झाली असली तरी कोणताही ठोस प्रस्ताव अद्याप पुढे आलेला नाही.

– राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवली महापालिका

Story img Loader