ठाणे, पालघर : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक बसगाडय़ा गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात रवाना झाल्याने या दोन्ही जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटीवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना ऐन सणासुदीच्या दिवसात गैरसोयीला सामोरे जावे लागले. राज्य परिवहन मंडळाच्या पालघर विभागातील २०१ बसगाडय़ा कोकणात पाठवण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील आठ आगारांमधील मध्यम व लांब पल्ल्याच्या किमान ११८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यातही मुरबाड, शहापूर, भिवंडी तसेच आसपासच्या गावांमधील एसटीची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
गणेशोत्सवानिमित्ताने ठाणे विभागातून राज्य परिवहन सेवेच्या एक हजार ९६४ बसगाडय़ा कोकणात सोडण्यात आल्या. सर्वाधिक बसगाडय़ा कल्याण-डोंबिवली आणि ठाणे शहरातून होत्या. या सर्व बसगाडय़ा अहमदनगर, धुळे, धाराशीव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर यासह विविध भागातून ठाण्यातून चालविल्या जात होत्या. ठाण्यातील सुमारे २५० बसगाडय़ा कोकणात वळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका बसला. राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागामार्फत एक हजार ९६४ बसगाडय़ांची नोंदणी करण्यात आली आहे. या सर्व बसगाडय़ा अहमदनगर, धुळे, धाराशीव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर आणि पुणे भागातून ठाण्यात आणल्या होत्या. यातील १४ सप्टेंबरला एक, १५ सप्टेंबर २७, १६ सप्टेंबर ९६६, १७ सप्टेंबर ८७८ आणि १८ सप्टेंबर ९२ इतक्या गाडय़ा सोडण्यात आल्या. गणेशोत्सवानिमित्ताने इतर भागातून बसगाडय़ा आणल्याने तेथील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. ठाणे विभागातूनही विविध आगारातून सुमारे अडीचशे बसगाडय़ा विविध विभागातून सोडण्यात आल्या होत्या.
हेही वाचा >>>कोकणच्या एसटी फेऱ्यांवर शिंदे पितापुत्रांची छाप; ठाणे विभागातून एक हजार बसगाडय़ांची नोंदणी
उत्पन्नापेक्षा तोटाच जास्त
राज्य परिवहन सेवेच्या या आगाऊ नोंदणीचा कोणताही फायदा राज्य परिवहन सेवेला होत नाही. उलट नुकसान होत असल्याचे एसटी महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले. बसगाडीची नोंदणी करताना दैनंदिन तिकिटाच्या दरभाडेनुसार तिकीट आकारले जाते. एसटी बसगाडय़ांमध्ये ४२ प्रवाशांसाठी आसन व्यवस्था असते. कोकणात प्रवाशांना सोडल्यानंतर बसगाडी पूर्णपणे रिकामी येते. त्यामुळे इंधन खर्च, वाहतूक कोंडी यामुळे नुकसान होते, असेही त्यांचे म्हणणे आहे.