बेलवली-तालुका शहापूर

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुका अशी ख्याती असूनही येथील अनेक गावपाडय़ांमध्ये पावसाळ्याव्यतिरिक्तच्या आठ महिन्यांत पाण्याचे दुर्भिक्ष असते. बेलवली गाव मात्र त्याला अपवाद आहे. या निसर्गरम्य गावात पाणी मुबलक असले तरी दळणवळणाच्या सुविधा मात्र अपुऱ्या आहेत. गावात आरोग्य सुविधांचा अभाव असून वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना पाच ते सहा किलोमीटरचा प्रवास करावा लागतो..

सुंदर निसर्गसौंदर्य आणि डोंगरकुशीत वसलेल्या शहापूरपासून १०-१५ किलोमीटर अंतरावर बेलवली हे गाव आहे. गावात येण्यासाठी एक छोटा पूल ओलांडावा लागतो. मुसळधार पावसात पुलावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे गावकऱ्यांचा बाह्य़ जगाशी संपर्क तुटतो. अशा वेळी ये-जा करण्यासाठी पाणी ओसरायची वाट पहावी लागते. गाव मात्र अगदी टुमदार, निसर्गचित्रात रेखाटल्यासारखे दिसते. गावात प्रवेश करतानाच आपल्याला एक शाळा दिसते. गावकऱ्यांनी स्वखर्चातून शाळा बांधल्याचे येथील गावकरी आणि शाळेचे शिक्षक धीरज डोंगरे अभिमानाने सांगतात. गावातील ही शाळा पहिली ते पाचवीपर्यंतच आहे. त्यानंतरच्या शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना एक ते दोन किलोमीटरवर असणाऱ्या टेंभुर्ली येथील शाळेत जावे लागते. शाळेत धीरज डोंगरे यांनी ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे येथील मुलांना मराठी वाङ्मयातील अक्षरशिल्पांची ओळख झाली. त्यांना वाचनाची गोडी लागली.

गावाच्या आजूबाजूला बरीच मोकळी जागा आहे. गावात दोन ते तीन जणांकडे म्हैशी आहेत. त्यामुळे गावात मुबलक प्रमाणात दूध उपलब्ध आहे. दर पाच मैलांवर भाषा बदलते असे म्हणतात. बेलवली गावातही त्याचा प्रत्यय येतो. येथील मराठी भाषेचा लहेजा काहीसा निराळा आहे. या गावात ६०-६५ घरे असून सुमारे ३५० लोकसंख्या आहे. पूर्वी या गावाला पाण्याचा मोठा त्रास होता. दीड ते दोन किलोमीटर दूरवर जाऊन पाणी आणावे लागत होते. मात्र आता शाई नदीचे पाणी गावकरी पिण्यासाठी वापरतात. गाव परिसरात काही वीटभट्टय़ा आहेत.  गावातल्याच लोकांच्या हा भट्टय़ा आहेत. बहुतेक घरे विटांची असून लादी मात्र सारवलेलीच दिसते. या गावात मोहाची झाडे असल्याने पावसाळ्यात येथील स्वयंपाकात मोहाचे तेल वापरले जाते. गावातील महिलाच हे तेल तयार करतात. गावात एकच छोटेसे किराणा मालाचे दुकान आहे.आता बहुतेक ठिकाणी शेती यांत्रिकी पद्धतीने केली जात असली तरी येथे मात्र बैलगाडय़ांचा वापर केला जातो. सर्व सण मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. गावात कातकरी समाजाची ८-१० घरे आहेत. ती सर्व मंडळी वीटभट्टय़ांवर काम करतात.

वैद्यकीय सुविधांचा अभाव

मुंबईपासून एक ते दीड तासाच्या अंतरावर असूनही बेलवली हे गाव गेली अनेक र्वष जिल्हा आरोग्य विभागातर्फे पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्राच्या प्रतीक्षेत आहे. येथील ग्रामस्थांनी अनेकदा सांगूनही जिल्हा शासकीय प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावात ग्रामस्थांनी शिक्षणासाठी स्वखर्चातून शाळा उभी केली. मात्र या गावाला स्वत:चे आरोग्य केंद्र नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करतात. त्यामुळे एखाद्या ग्रामस्थाला साप किंवा विंचू चावला असता त्यांना त्यांचे प्राण गमावावे लागत आहेत. शिवाय एखादा ग्रामस्थ, गॅस्ट्रो, ताप आदीसारख्या रोगाने आजारी पडल्यास गावापासून दुर्गम भागात असलेल्या व गावापासून पाच ते सहा किलोमीटरवर असणाऱ्या टाकी पठार या गावातील आरोग्य केंद्राला भेट द्यावी लागते. या भागात जाण्यासाठी कोणत्याही सोयीसुविधा नसल्याने रुग्णाला प्राण गमवावे लागतात. येथील जवळचे आरोग्य केंद्र डोळखांब सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे. दुपारी साडेबारा आणि संध्याकाळी पाच अशी दोनदा तिथे जाण्यासाठी एस.टी.सुविधा आहे. दिवसातून किमान दोनदा का होईना, त्यांना जाण्या-येण्याची सुविधा असल्याने त्यांना येथील आरोग्य केंद्र जवळ पडते. या संदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही त्यांना दूरवरच्या टाकी पठार येथील आरोग्य केंद्रातच उपचार घेण्यासाठी जावे लागते.

आरोग्य केंद्र उभारण्याची तयारी

पूर्वी डोळखांब येथील आरोग्य केंद्रावर गेल्यानंतर ग्रामस्थांवर उपचार केले जात नव्हते. मात्र ग्रामस्थांनी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सामंजस्याने चर्चा केल्यानंतर सध्या त्यांच्यावर तात्पुरते उपचार केले जात आहेत. जशी स्वखर्चातून शाळा उभारली, त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रासाठीही प्रयत्न करू, असे येथील ग्रामस्थ हिरामण भोईर सांगतात. डोळखांब येथील आरोग्य केंद्रातही पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. विशेषत: सर्पदंशावर उपचार नसल्याने रुग्णाला शहापूरला न्यावे लागते. या गावात साग, मोह, खैर, कांचन आदी झाडे मुबलक प्रमाणात आहेत. शिवाय गावकऱ्यांनी काजू, सीताफळ, चिकू आदी झाडे लावली आहेत. गावकरी खूप मेहनती असून अगत्यशील आहेत.

विजेचा लपंडाव, अपुरी वाहतूक व्यवस्था

गावातील बरेचजण कल्याण-डोंबिवलीसारख्या शहरात वाढपी म्हणून काम करीत आहेत. गावात विजेची फार मोठी समस्या आहे. विजेचा सारखा लपंडाव सुरू असतो. एकदा वीज गेली की ती पुन्हा कधी परत कधी येईल, याचा नेम नसतो. त्यामुळे पंप चालत नाहीत. परिणामी नागरिकांचे बरेच हाल होतात. गावात दिवसातून दोनदाच बसची सुविधा आहे. बस सकाळी १२ वाजता येते आणि त्यानंतर दुपारी ४ वाजता. गावकऱ्यांचा बाहेरील जगाशी संबंध या दोनच गाडय़ांवर अवलंबून आहे. त्या चुकल्या की पायी येण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नाही. गावाच्या अवतीभोवती जंगल आहे.

Story img Loader