ऋषिकेश मुळे

वागळे, दिवा येथील रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न;  मूळ प्रश्न मात्र कायम

वागळे इस्टेट परिसरातील कचरा हस्तांतरण स्थानक आणि दिवा कचराभूमीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी महापालिकेने कचऱ्याची अपायकारक दरुगधी आणि विघटन करण्यासाठी जैविक द्रवाचा मारा करण्याचे ठरविले आहे. दिवा येथील कचराभूमी हलवावी यासाठी स्थानिक रहिवाशी कमालीचे आग्रही आहेत. मात्र, याबाबत काहीही उपाय न करणाऱ्या महापालिकेने सुगंधी द्रव फवारणीसाठी मात्र एक कोटी १७ लाख रुपये मोजण्याची तयारी चालवली आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिवा येथील कचराभूमी हटवण्याचे आश्वासन दिले होते. श्रीकांत शिंदे निवडून आल्यानंतर कचराभूमी हटवण्याच्या कामाला गती मिळेल, अशी दिवावासीयांची आशा होती. मात्र, महापालिकेने कचराभूमी हटवण्याऐवजी रहिवाशांच्या तक्रारी तात्पुरत्या दूर करण्याचे प्रयत्न आरंभले आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिवा डम्पिंगमधील कचऱ्याचे विघटन व्हावे त्याचबरोबर कचऱ्याची दरुगधी कमी व्हावी याकरिता या कचऱ्यावर जैविक द्रवाचा मारा करण्यात येणार आहे.  वागळे इस्टेट येथील कचरा हस्तांतरण स्थानकातील कचऱ्यावर देखील जैविक द्रवाचा फवारा करण्यात येणार आहे. दिवा डम्पींग आणि वागळे इस्टेट कचरा हस्तांतरण स्थानक या दोन्ही ठिकाणच्या कचऱ्यावर सुमारे तीन हजार लिटर जैविक द्रवाची फवारणी करण्यात येणार आहे.

सुगंधी द्रव कोणते?

एसआर-२ आणि एसआरसी ३ हे द्रवपदार्थ कॅनडा येथून आयात करण्यात येतात. कचऱ्यावर त्यांची फवारणी केल्यानंतर त्या संयोगातून निर्माण होणारे जैविक घटक कचऱ्यापासून दरुगधी निर्माण करणाऱ्या घटकांना नष्ट करतात व कचऱ्याचे विघटनही करतात. हे द्रव पाइन आणि लिंबाचा सुगंध निर्माण करतात.

नागरिकांच्या सुखसुविधेच्या दृष्टिकोनातून कचरा डम्पिंगवर ही एसआर-२ आणि एसआरसी ३ या जैविक द्रवाची फवारणी करण्यात येणार आहे. हे जैविक द्रव कचरा दरुगधीसाठी आणि विघटनासाठी परिणामकारक ठरतात.

– बालाजी हळदेकर, उपायुक्त-घनकचरा व्यवस्थापन

Story img Loader