tvlogस्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे. या आजाराच्या लक्षणांची सुरुवात साधारण १५ ते २३ या वयोगटात दिसते. भास होणे, अवास्तव संशय, एकाग्रता कमी होणे, औदासीन्य, चिंता, एकटे राहणे, कोणामध्येही न मिसळणे, स्वतशीच हसणे-बोलणे, आंघोळ न करणे यासारखी लक्षणे आजाराच्या सुरुवातीला दिसतात. कधी कधी खोटे बोलणे करणे, शिवीगाळ करणे, ‘इतर लोक आपल्या वाईटावर टपलेली आहेत’ असा पूर्वग्रह करून इतरांवर संशय घेणे अशी लक्षणेही आढळतात. या सर्व लक्षणांची सुरुवात होऊन घरच्या लोकांना समजेपर्यंत काही काळ जातो. बरेचदा असा त्रास होणारी व्यक्ती शाळा, कॉलेज अथवा नोकरीधंद्याला जाणे थांबवते. अखेर मनोविकारतज्ज्ञाची पायरी चढली जाते.
आपल्या समाजात मानसिक आजारांभोवती स्टिग्मा म्हणजेच ‘कलंकाचे’ आवरण आहे. लोकांना हे आवरण तोडून, उपचार घेण्यासाठी पाऊल उचलणे ही मोठी धीराची गोष्ट असते. काही वेळेला मनोविकारतज्ज्ञापर्यंत पोहोचेपर्यंत आजार जुना झाला असतो आणि बऱ्यापकी बळावलेला असतो. औषध उपचार सुरू होतात आणि अनेक
लक्षणे, जसे की भास होणे, राग, संताप, संशय इत्यादी लवकर आटोक्यात येतात. मागे राहतात ती निस्तेज करणारी विझलेली लक्षणे! झोपून राहणे, कोणामध्ये न मिसळणे, अनुत्साह, काहीही कृती करायची इच्छा न होणे या लक्षणांमुळे बरेचदा रुग्ण घरात राहतात. ते एका कोषात जगतात. त्यांचं शिक्षण अथवा नोकरी सुटते.
आय्.पी.एच्.मध्ये अशा रुग्णांच्या कुटुंबीयांनी म्हणजेच शुभंकरांनी एकत्र येऊन ‘सुह्रद’ या स्वमदत गटाची स्थापना केली. या गटाची स्थापना ही शुभंकरांच्या गरजेतून झाली. त्यांना आपले दुख समजून घेणारे सुह्रद भेटत गेले आणि जगण्याची उमेद वाढली. त्या सर्वापुढची चिंता होती ती अशा निस्तेज झालेल्या, घरात बसलेल्या तरुण मुला-मुलींची! काय बरे करता येईल त्यांच्यासाठी? पहिला काही काळ ही एकमेकांशी ओळख होणे आणि एकमेकांची सवय होणे यात गेला. थोडय़ा चच्रेनंतर काम करायचे निश्चित झाले आणि त्रिदल या पुनर्वसन कार्यशाळेची (अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर) स्थापना झाली. भाज्या निवडून त्यांची पाकिटे आय्.पी.एच्. काऊंटरवर विकणे, नकली दागिने बनवणे, पणत्या रंगवणे, राख्या बनवणे असे अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आले.
या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले. सगळ्यात महत्त्वाचा धडा आम्ही शिकलो तो म्हणजे शुभार्थीना नियमितपणे त्रिदलला यायला तयार करणे. दुसरे म्हणजे त्यांना जमेल अशाच कामांची निर्मिती करणे. उदा. आजार जुना झाल्यामुळे आणि बराच काळ औषध घेतल्यामुळे खूप कलाकुसरीची कामे जसे की नकली दागिने बनवणे यात सफाई येऊ शकत नाही. पण निवडणे, भाजणे, मापणे ही कामं जमत होती. तिसरे असे लक्षात आले की त्रिदलला जसे शुभंकरांच्या देखरेखीखाली शुभार्थी काम करतात तसेच शुभंकर नसलेल्या स्वयंसेवकांचीही मदत होते आणि गरज असते. स्वयंसेवी शुभंकर हे असे स्वयंसेवक असतात, ज्यांच्या घरात कोणीही मानसिक रोगी नाही, पण ते आपला वेळ आणि सेवा ही त्रिदलला देतात. त्यांच्या असण्याने शुभार्थीना समाजात वावरण्याची सवय व्हायला मदत होते.
आज आमचे शुभार्थी त्रिदलला येऊन कॅलप्रो (आरोग्यदायी खिरीचे मिश्रण) वेगवेगळ्या  प्रकारच्या चटण्या, चिवडा, लाडू, भाजणी, पिशव्या शिवणे, इत्यादी कामे अगदी सहजतेने करतात. या वस्तू विकून झालेल्या नफ्यातून आम्ही काही पसे दोन ते तीन महिन्यातून एकदा शुभार्थीना देतो. पसे देताना त्यांचा नियमितपणा, काम करण्याची पद्धत, स्वच्छता, एकमेकांशी स्वतहून संवाद साधणे, स्वतहून काम करायची तयारी दाखवणे, सामान विकायला काऊंटरवर बसणे अशा निकषांचा आधार घेतला जातो.
त्रिदलला २०२५ शुभार्थी येतात. कोणत्याही सायकिअ‍ॅट्रिस्टच्या उपचाराखाली असलेल्या रुग्णांना इथे त्रिदलला येता येते. त्रिदलला येणे सुरू करायच्या आधी त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी आमचे समुपदेशक दीर्घ चर्चा करतात. त्रिदल हा एक स्वमदत गट आहे हे स्पष्ट केले जाते. इथे दर महिन्याला पगार दिला जात नाही. त्रिदल हा शुभार्थीना निरोगी आयुष्याकडे नेणाऱ्या प्रवासातला एक टप्पा आहे. त्रिदलला यायला लागून एक प्रकारच्या शिस्तीची सवय करून काही शुभार्थी हे इतर ठिकाणी नोकरीलाही लागले आहेत किंवा काहींनी आपला छोटासा धंदाही सुरू केला आहे.
त्रिदल म्हणजे तीन दलांचा समूह. इथे शुभार्थी (रुग्ण), शुभंकर (कुटुंबीय, मानसिक आरोग्यसेवक, स्वयंसेवक) आणि समाज या सर्वानी एकत्र येऊन केलेला प्रवास. आज त्रिदलची वर्षांची उलाढाल दहा लाखाच्या घरात आहे. नियमित येणाऱ्या शुभार्थीना हे पसे वाटून दिले जातात. त्रिदलमध्ये बनवलेल्या वस्तू आम्ही आय्.पी.एच्.मध्ये ९व्या मजल्यावर विकतो. कॅलप्रो हे उत्पादक ग्राहक पंचायत आणि टाटा कॅन्सरचे सेंट ज्युड केंद्र येथे नियमित पाठवले जाते.
त्रिदलसाठी संपर्क – मीरा- ९७६६०३१९५०,
अस्मिता- ९७६९९८०२१४०

Story img Loader