या शुभार्थीची कार्यक्षमता बरीच कमी असल्याने त्यांना बाहेर जाऊन नोकरी करणे, तेथील ताणतणावांना तोंड देणे, ती टिकवणे व बाहेरच्या जगात मदतीशिवाय वावरणे या गोष्टी जमण्यासारख्या नसल्याने या सुरक्षित वातावरणात ते चांगले रुळले. पण स्किझोफ्रेनिया हा आजार असा आहे की त्याच्या रुग्णांमध्ये वेगवेगळ्या क्षमतांचे रुग्ण असतात. आमच्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये अधिक क्षमता असलेले काही शुभार्थी होते, जे नियमितपणे औषध घेत होते, मधील काही वर्षांच्या/महिन्यांच्या खंडानंतर त्यांनी नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षण परत चालू केले होते. त्यात ते बऱ्यापैकी यशही मिळवू लागले होते. पण चारचौघांत वावरताना कधी आत्मविश्वास कमी पडत असे तर कधी इतरांशी वागताना प्रसंगानुसार बदलणे त्यांना जमत नसे. आमच्याकडील समुपदेशकांच्या हे लक्षात आले की काही जमांच्या बाबतीत हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता तर काही जणांच्या बाबतीत आजाराचा त्यांच्यावर झालेला परिणाम होता. अशा शुभार्थीना व्यक्तिगत मदत (समुपदेशन) करण्यापेक्षा त्यांचा गट तयार केल्यास त्या आधार गटातील इतर सभासदांपासून ते समाजात वावरण्यासाठी लागणारी कौशल्ये शिकू शकतील, असे आम्हाला जाणवू लागले व त्यातून या अधिक कार्यक्षमतेच्या शुभार्थीचा गट सुरू झाला. पहिल्या दोन गटसभांना सभासदांचा प्रतिसाद खूपच छान मिळाला व अशा प्रकारचा गट कुठेच नाही हे समजल्यावर त्यांनीच उत्स्फूर्तपणे त्या गटाचे ट्रेंडसेटर्स हे नामकरण केले.पाच वर्षांपूर्वी हा गट सुरू झाला. सहा गटसभांनंतरच या गटाचा आम्हाला खूप उपयोग होतो, हे एकमताने सर्वानी सांगितले. नोकरीत वरिष्ठांचा वाटणारा दबाव, सहकाऱ्यांचे शेरे, टोमणे, विनोद यांना तोंड देताना येणारा स्ट्रेस, कामाची टारगेट्स सांभाळताना होणारी तारांबळ आदी अनेक गोष्टी चर्चेत असतात व सर्व जण त्यात मोकळेपणाने भाग घेतात. आपण वापरत असलेले उपाय शेअर करतात. एखाद्याने औषध बंद करावेसे वाटते असे शेअर केल्यास इतर सर्व त्याला किंवा तिला त्यापासून परावृत्त करतात. त्या सर्वाची आपसात इतकी मैत्री झाली आहे की इतर वेळीही एकमेकांना फोन करून काही मदत लागल्यास करतात.  या सर्वाचा मित्रमंडळी जोडण्याचा, जमवण्याचा काळ आजारात गेल्याने पूर्वीचे मित्र तुटले आहेत व या वयामध्ये (२५ च्या पुढे) नवीन मित्र करण्याची संधीही नसते व स्वत:च्या आजाराचा गंड असल्याने कोणाशीही जवळीक करण्याची भीती वाटते. ही सर्व समदु:खी मित्रमंडळी असल्यामुळे आजाराबद्दल लपवण्याचा प्रश्न नसतो. आजाराबद्दल मोकळेपणाने बोलण्याची ही एकमेव जागा असते, कारण कुटुंबातील माणसांना टेन्शन येईल म्हणून तो विषय ते घरी टाळतात. या गटातील सुषमा (नाव बदललेले) सांगते, ‘माझ्या आजाराच्या काळात आईबाबा मला भीती वाटेल म्हणून आजाराबद्दल बोलत नसत. मी नेटवर वाचलेली माहिती भीतीदायक होती. त्यामुळे आपल्याला काही तरी खूप गंभीर आजार आहे, या दडपणाखाली मी कायम असे. कॉलेजची तीन वर्षे बुडाल्याने मित्रमैत्रिणी तुटल्या होत्या. बाहेर पडावेसे वाटायचे, पण सध्या काय करतेस या लोकांच्या प्रश्नाची भीती वाटायची, पण परत हिय्या करून कॉलेज सुरू केले व त्याच वेळी ट्रेंडसेटर्सला येण्यास सुरुवात केली. त्यामुळे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली व लोकांना सामोरे जाणे जमू लागले.’ प्रमोदने (सुमारे चार वर्षांनंतर) एक बेताची नोकरी धरली व काम करू लागला. त्याची प्रगती पाहून त्याला वरिष्ठांनी जबाबदारीचे काम दिले. जमेल की नाही या भीतीने त्याने कामावर जाणेच बंद केले. त्यानंतर शनिवारी गटाच्या दिवशी त्याने हे घाबरतच शेअर केले. गट संचालन करणाऱ्या समुपदेशकांनी व इतर सभासदांनी त्याला वरिष्ठांशी बोलण्याचा पर्याय वापरण्यास सांगितले. त्याला रोल प्ले करून काय व कसे बोलशील हेही शिकवले. तो कामावर गेला व वरिष्ठांशी मोकळेपणाने आजाराबद्दलही बोलला. वरिष्ठांनी त्याची समस्या जाणून जमण्याजोगे काम दिले, हे त्याला सुखद आश्चर्यच होते. अशा अनेक समस्यांमध्ये त्यांना मार्गदर्शन व पर्याय मिळतात. या गटानेच पुढाकार घेऊन त्रिदलच्या सदस्यांना मदत करायचे ठरवले व त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्यापुढे तशा प्रकारचे कार्यक्रम सादर केले.
‘त्रिदल’साठी संपर्क – अस्मिता  ९७६९९८०२१४०

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा