सहा महिन्यानंतरही पाच कोटी बँकेतच; विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वळती करण्यास विलंब

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून सहा महिन्यांपूर्वी देण्यात आलेली कोटय़वधी रुपयांची शिष्यवृत्तीची रक्कम अद्याप आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्य़ातील ४१ हजार ४६८ आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येणारी तब्बल ५ कोटी १५ लाख २३ हजार ५०० रुपयांची रक्कम ६ मार्च रोजी पाठवली. मात्र आता सहा महिन्यानंतरही ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने ती रक्कम अद्याप विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही.

शासकीय योजनेतील झारीतील शुक्राचार्याना बाजूला सारून मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा व्हावी, या उद्देशाने अवलंबविण्यात आलेली ऑनलाइन प्रक्रियाही सुस्त नोकरशाहीमुळे सर्वसामान्यांना न्याय देण्यात कशी कुचकामी ठरते हे आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात होत असलेल्या दिरंगाईतून दिसून आले आहे. राज्य शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून जाहीर केलेली शिष्यवृत्तीची रक्कम सलग दोन वर्षे ठाण्यातील हजारो विद्यार्थ्यांना मिळू शकलेली नाही. आता तिसऱ्या वर्षांची पहिली तिमाही संपत आली तरी शिष्यवृत्ती रकमेचा पत्ता नाही. त्यामुळे आदिवासींमध्ये नाराजी आहे. आदिवासींसाठी शासनाने जाहीर केलेल्या विविध कल्याणकारी योजना प्राधान्याने राबविण्यात येतील, असे आश्वासन दस्तुरखुद्द

मुख्यमंत्र्यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना दिले होते. मात्र प्रशासकीय दिरंगाईने मुख्यमंत्र्यांच्या या निर्धाराला हरताळ फासला गेला आहे.

सुवर्णमहोत्सवी आदिवासी प्रोत्साहन शिष्यवृत्ती योजनेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एक हजार, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दीड हजार तसेच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये वार्षिक देण्यात येतात. रोखीच्या व्यवहारात होणारे संभाव्य गैरव्यवहार टाळण्यासाठी अनुदान अथवा शिष्यवृत्तीच्या रकमा लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्य़ातील आदिवासी विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडणे क्रमप्राप्त होते. यंत्रणेतील दोषांमुळे त्याला बराच वेळ लागला. परिणामी गेली सलग दोन वर्षे शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना मिळू शकलेली नाही.

अखेर गेल्या मार्च महिन्यात जिल्ह्य़ातील पात्र आदिवासी विद्यार्थ्यांच्या याद्या अद्ययावत करून त्यांना देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम जिल्हा परिषदेने बँकेत भरली. मात्र सहा महिन्यानंतरही पाच कोटींहून अधिक रक्कम विद्यार्थ्यांमध्ये वितरित होऊ शकलेली नाही.

जिल्हा परिषदेकडून मार्च महिन्यात रक्कम पाठविल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात बँकेला ७ जून रोजी ही रक्कम मिळाली आहे. तांत्रिक दोषांमुळे विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास वेळ  लागत आहे. मात्र येत्या तीन-चार दिवसांत सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.

-राजेंद्र दोंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. 

 

विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात

येत्या आठ दिवसांत सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम सव्याज जमा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती संघटनेच्या अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी दिला आहे.

Story img Loader