कल्याण– अतिवृष्टीमुळे सलग दोन ते तीन दिवस शासन आदेशावरुन शाळा बंद ठेवल्या जात आहेत. घरी असताना विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड नको म्हणून येथील सम्राट अशोक विद्यालयाने ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभ्यास वर्ग घेतले.
अतिवृष्टीमुळे मागील चार ते पाच दिवसांपासून कल्याण शहराच्या विविध भागात पाणी तुंबले आहे. अनेक विद्यार्थी दुर्गम भागात राहतात. त्यांना शाळेत येणे अवघड होते. सर्वदूर पावसाचा मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन शासनाने मागील दोन ते तीन दिवसांपासून सार्वजनिक सुट्टी झाहीर केली आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीत सराफाकडून ग्राहकांची फसवणूक; महिला ग्राहकांकडून सराफाच्या ऐवजावर डल्ला
अचानक शाळांना सुट्टी मिळाली की विद्यार्थी आनंदित होऊन घरी अभ्यास करतातच असे नाही. अनेक विद्यार्थ्यांचे पालक नोकरीला जातात. त्यामुळे घरात एकटी असली की मुले दूरचित्रवाणी पाहत बसतात. मोबाईलवर खेळत बसतात. आता घटक चाचणी परीक्षा जवळ आल्या आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. शाळेची गुणवत्ता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग करुन सम्राट अशोक विद्यालयाने विद्यार्थ्यांचा ऑनलाईन माध्यमातून अभ्यास घेतला, अशी माहिती सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी दिली.
शाळेच्या गणवेशात विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत घरातील योग्य ठिकाणी बसण्यास सांगण्यात आले. ऑनलाईन माध्यमातून वर्गात शिकवतात त्याप्रमाणे प्रत्येक शिक्षक या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला. मुसळधार पाऊस असला की मुले गटाने मौज मजा करण्यासाठी आजुबाजुच्या ओढ्यावर, माळरानावर मौज करण्यासाठी जातात. पालकांना हे माहिती नसते. अशा प्रकारातून काही दुर्घटना घडतात. हा सगळा विचार करुन अतिवृष्टीमुळे घरी असलेल्या मुलांना घरीच अभ्यासात गुंतवून ठेवण्याचा निर्णय शाळेने घेतला. विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यासारखे घरातून केलेल्या अभ्यासाला प्रतिसाद दिला. ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. मागील तीन दिवसांपासून हा उपक्रम सुस्थितीत सुरू आहे.
हेही वाचा >>> उद्धव ठाकरे उद्या ठाण्यात
आता माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने शाळेप्रमाणेच ऑनलाईन माध्यमातून अभ्यास करण्याची ओढ विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, हाही या उपक्रमामागील उद्देश असे मुख्याध्यापक पाटील यांनी सांगितले. व्हॉट्सपच्या माध्यमातून मुलांना अभ्यास देण्यात आला. तो दिलेल्या वेळेत मुलांनी सोडविला. पाली भाषा प्रचार आणि प्रसार संस्थेच्या पदाधिकारी, पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.