ठाणे : चार शिक्षिकांसोबत गैरवर्तन केल्याच्या कारणावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलेल्या शाळेच्या संचालकावर आता श्रीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. नोकरीवर कायमस्वरुपी करण्याचे अमिष दाखवून तसेच कुटुंबियाला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची तक्रार एका शिक्षिकेने दिली असून या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला असून त्याला श्रीनगर पोलीसांनी अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरात असलेल्या एका शाळेतील संचालक हा गैरवर्तन करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी शाळेतील शिक्षकांनी केला होता. या शिक्षकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ही बाब सांगितली. तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या संचालकाला चोप दिला होता. आता, या संचालका विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात आणखी एका शिक्षिकेने तक्रार दाखल केली आहे. २०१३ मध्ये या महिलेला नोकरीची गरज असल्याने ती आपल्या वहिनीच्या ओळखीने या संचालकाला भेटली होती. त्यावेळी शाळेला ग्रँट मिळणार असून येत्या दिवसात तुला कायमस्वरुपी नोकरीला ठेवेल त्यासाठी सात लाख रुपयाची मागणी सुरुवातील त्या संचालकाने केली. त्यावेळी पिडीत शिक्षिकेने दागिणे विकून संचालकाला सहा लाख रुपये दिले. परंतू, त्यानंतर पुन्हा संचालकाने तिच्याकडे दहा लाखांची मागणी केली. तसेच पैसे देणे शक्य नसेल तर, माझ्यासोबत शारिरिक संबंध ठेवण्याची मागणी संचालकाने पिडित शिक्षिकेला केली. यावर पिडीत शिक्षिकेने त्याला विरोध केला.

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर संचालकाने मार्च २०२३ मध्ये शाळेतील त्याच्या कार्यालयात पिडीत महिलेला बोलावले. त्यांनतर, तिच्या डोक्यावर बंदूक ठेवून कायमस्वरूपी नोकरी हवी असेल तर, शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुला नोकरीवरुन काढून टाकेल आणि तुझ्या कुटूंबाला आपल्या संबंधा बद्दल खोटे सांगेल अशी धमकी दिली. त्यानंतर, तुझ्या घराजवळ मी मिटींगकरिता जात आहे, तुला घरी सोडतो असे सांगून संचालकाने पिडीत महिलेला जबरदस्ती गाडीत बसविले आणि एका हॉटेलच्या खोलीत मिटींगच्या बहाण्याने नेऊन त्या महिलेवर बलात्कार केला. यानंतरही संचालक वारंवरा धमकी देत असल्याने महिलेने श्रीनगर पोलीस ठाण्यात संचालका विरोधात तक्रार दाखल केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School director rapes teacher after promising to make her job permanent in thane zws