तुमचा मुलगा जन्मत:च कर्णबधीर आहे. त्याला ऐकू येणार नाही. डॉक्टरांचे ते शब्द कानात तप्त रस ओतल्यासारखे घुसले. आता आपल्या मुलाचे कसे होणार या चिंतेने गण्याचे आई-वडील त्रस्त होते. घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे कर्णबधिरांसाठीच्या ‘बडय़ां’च्या शाळेत घालणे शक्य नव्हते. या कठीण काळात एक दिवस त्यांच्या दारात काही व्यक्ती आल्या व त्यांनी घरात कोणी कर्णबधीर आहे का, याची विचारपूस केली. त्यांना जेव्हा गण्याची माहिती मिळाली तेव्हा आलेल्या व्यक्तींनी आमच्या शाळेत त्याला पाठवा. एक रुपयाही खर्च येणार नाही. दुपारचे जेवणही आम्हीच देतो असे सांगितले आणि गण्याच्या आई-वडिलांच्या हृदयावरचे ओझेच उतरले. गण्या आता सातवीमध्ये आहे. अशी अनेक मुले डोंबिवलीमधील संवाद कर्णबधीर प्रबोधीनीच्या शाळेत शिकत आहेत.
कर्णबधीर मुले व त्यांच्या पालकांच्या समस्या लक्षात घेऊन हा ‘संवाद’ साधला तो अपर्णा आगाशे यांनी. खरेतर त्यांनी केलेला हा खटाटोप कोणालाही भावणारा असाच म्हणावा लागेल. मॅट्रिक चे शिक्षण झाल्यानंतर त्यांचे लग्न झाले. दोन मुलांमधील धाकटा अमेय लहान असताना आजारपणात त्याची श्रवणशक्ती गेली. हा आघात अपर्णा व त्यांचे पती अनिल यांच्यासाठी मोठा होता. मात्र मुलाची श्रवणशक्ती गेली तरी अपर्णाताईंची जिद्द कायम होती. लहानग्या अमेयला बाजारात घेऊन जाताना तसेच घरातही वेगवेळ्या वस्तुंची ओळख करून देण्यापासून श्रवणशक्ती गमाविल्यामुळे आवश्यक ते शिक्षण देण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरु केले. डोंबिवलीमधील ‘अस्तित्व’ या शाळेत अमेय शिकत असताना अपर्णाताईंनी काही पालकांच्या सहकार्याने ‘संवाद कर्णबधीर प्रबोधिनी’ची स्थापना केली. सुरुवातीला ही शाळा त्यांच्या घरातूनच चालायची. पुढे मुलांची संख्या वाढू लागली तशी जागा अपुरी पडू लागली. त्यातून मग काळूनगर, ठाकूरवाडी येथील आरोग्य केंद्रातील दुसऱ्या मजल्यावरील जागा घेतली. या जागेतूनच सध्या शाळेचा कारभार चालवला जातो. १० जून १९९२ रोजी स्थापन केलेल्या या शाळेमुळे अनेक कर्णबधीर मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. हा प्रवास तसा खडतरच. परंतु अरुण व स्नेहलता कुलकर्णी, नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, सुषमा गोखले व दीपेश म्हात्रे यांच्यासारख्या संचालक मंडळाच्या सहकार्यातून आज शाळेला आकार मिळाल्याचे अपर्णाताईंनी आवर्जून सांगितले. प्रामुख्याने गरीब घरातील मुलांना शोधून शाळेत दाखल केले जाते. त्यासाठी अनेकदा त्यांच्या पालकांना समजवावे लागते. कर्णबधील मुलांचे प्रश्न गेवळेच असतात. त्यांना समजून घ्यावे लागते. त्यांच्यातील आत्मविश्वास टिकावा यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. समाजात त्यांना स्वत:च्या पायावर ताठ मानेने उभे करणे हे आमचे धेय्य आहे. यासाठी संस्थेचे सर्व सदस्य तसेच शाळेतील शिक्षकवर्ग मनापासून काम करत असतात. आमच्या शाळेला सातवीपर्यंत समाजकल्याण विभागाची मान्यता असली तरी आम्ही १७ क्रमांकाचा फॉर्म भरून या मुलांना दहावीला बाहेरून बसवतो. आजपर्यंत दहावीला बसलेली सर्वच्या सर्व म्हणजे ३५ मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्या अर्थाने आमचा रिझल्ट शंभर टक्के लागल्याचे अपर्णाताई अभिमानाने सांगतात. आमच्या शाळेत या विशेष मुलांना शिकविण्यासाठी पाच शिक्षक अधिक दोन कला शिक्षक तसेच शिपाई व लिपिक काम करतात. शिशू गटातील मुलांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी दृकश्राव्य माध्यमाचा वापर केला जातो. सध्या शाळेत ४७ मुले असून त्यांच्या गणवेषापासून दुपारच्या जेवणापर्यंतची सर्व व्यवस्था संस्थेच्यावतीनेच केली जाते. शासनाचे अनुदान साधारणपणे तीन लाख रुपये मिळत असून वार्षिक खर्च पंधरा लाखांच्या आसपास आहे. परिणामी समाजातील दात्यांकडून मिळणाऱ्या मदतीवर संस्थेचा कारभार प्रामुख्याने अवलंबून आहे. महाराष्ट्रात कर्णबधीर, अंध, गतिमंद मुलांसाठी मोठय़ा प्रमाणात शाळा उभ्या राहण्याची गरज आहे. दुर्दैवाने कुणी शिक्षण सम्राट यासाठी पुढे येत नाही. कारण पालकांकडून देणगी तसेच मानमरातब मिळण्याची वगैरे शक्यता नसते. सामाजिक बांधीलकीची जाणीव असलेल्या व्यक्तीच अशा समाजकार्याचे आव्हान पेलू शकतात. अपर्णाताईंनी ते पेलले एवढेच नव्हे तर या मुलांसाठी वसतिगृहही निर्माण केले. कल्याण-डोंबिवली महापालिकेने त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असून येथे २० मुलांची सोय होणार आहे. अर्थात या गोष्टी सहज घडत नसतात. सरकार दरबारी किती उंबरठे अशा सामाजिक कामांसाठी झिजवावे लागतात ते ‘जावे त्यांच्या वंशा’ तेव्हाच कळते. या साऱ्या वाटचालीत अपर्णाताईंचे पती अनिल यांचीही मोलाची साथ त्यांना लाभली आहे. सध्या साठीच्या घरात असलेल्या अपर्णाताईंची वृद्धाश्रम सुरु करण्याचीही संकल्पना आहे. कर्णबधीर मुलांसाठी वसतीगृह सुरु केले असले तरी हा पसारा नीट चालावा यावर त्यांचा सध्या भर आहे. प्रसिद्ध साहित्यिक शं. ना. नवरे यांनीही संस्थेला चांगली आर्थिक मदत केली. त्यांच्या प्रमाणेच आयआरबीचे म्हैसकर व महालक्ष्मी ट्रस्टने गेली काही वर्षे नियमितपणे ठोस मदत केल्याचेही अपर्णाताईंनी आवर्जून सांगितले. तुमचे काम चांगले असेल तर समाजाकडून तुम्हाला निश्चित मदत मिळते असा त्यांचा विश्वास आहे. कर्णबधीर मुलांना गरज आहे ती तुमच्या मायेच्या सावलीची. त्यांना कदाचित एकदा सांगून एखादी गोष्ट समजणार नाही तेव्हा तुम्ही तुमच्यावर संयम ठेवून त्यांच्याशी वागणे आवश्यक आहे. ही मुले घाबरून जाऊन न्युनगंडाची शिकार होऊ शकतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. काही गोष्टी समाजानेही अशा मुलांसाठी हाताळणे आवश्यक आहे. खासकरून जेव्हा अशी अपंग मुले शासकीय किंवा अन्य सेवेत काम करतात तेव्हा त्यांना आधार हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. या मुलांना तुमच्या दयेची अथवा सहानुभूतीची नाही तर तुमच्या मैत्रीची गरज आहे. एका मध्यवर्गीय घरातील अपर्णाताईनी सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली त्याला सर्वानीच साथ देण्याची गरज आहे.
अपर्णा आगाशे – ७७३८७११०३२
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा