लहान मुलांपासून तरुणांपर्यंतच्या वयोगटात लोकप्रिय झालेल्या ‘पब्जी’ या मोबाइल गेमचे मानसिक दुष्परिणाम समोर येऊ लागल्यामुळे समाजात चिंतेचे सूर उमटू लागले आहेत. केवळ ‘पब्जी’च नव्हे तर, विविध ऑनलाइन गेम आणि समाजमाध्यमांच्या अ‍ॅपचे मुलांना जणू व्यसनच जडू लागले आहे. हा विळखा सोडवण्यासाठी आता शिक्षणसंस्थांनीच पुढाकार घेण्यास सुरुवात केली असून मुंबई-ठाण्यातील काही शाळांनी विद्यार्थ्यांसह पालकांचे समुपदेशन करणाऱ्या कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे.

गेममधील सर्व स्पर्धकांना ‘ठार’ करून शेवटपर्यंत जिवंत राहण्याची स्पर्धा असलेल्या ‘पब्जी’ गेमचे आकर्षण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.

डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर विद्या मंदिर शाळेच्या पर्यवेक्षिका लीना मॅथ्यू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये असे बदल जाणवू लागल्याने त्यांनी विद्यार्थी हिंसक का बनतात, त्यांचा राग अनावर का होतो, याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनेक विद्यार्थी पब्जीच्या आहारी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मॅथ्यू यांच्या सहकारी प्रज्ञा बापट, लीना ठाकूर, मनीषा केंद्रे, लीना दाणी यांनी या खेळाची माहिती विविध माध्यमातून संकलित केली व त्याच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांकरिता पालक सभेचे आयोजन केले. या खेळांतून होणारे वर्तनबदल यावर शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती दिल्याचे शाळेच्या समुपदेशिका श्वेता बंगाली यांनी सांगितले. इंग्रजी शाळांत विविध प्रकारच्या ऑनलाइन खेळांच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. आमच्या शाळेत अशा विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाते, असे ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी शाळेचे संस्था विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी सांगितले. तर, घोडबंदर येथील ज्ञानगंगा महाविद्यालयात कलाकृतीच्या कार्यशाळा घेऊन त्यांचे लक्ष अन्यत्र वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सहाय्यक प्राध्यापिका रूपाली मंडलिक यांनी सांगितले.

पब्जी किंवा अन्य गेम हे अतिरंजक असतात. ते आभासी जगात मुलांना नेतात. त्यात रमताना त्यांच्या भावनांचा निचरा होत असावा.  नेमकी हीच बाब या खेळांमुळे व्यसनाधीन झालेल्या विद्यार्थ्यांना आवडते. ते वास्तववादी नसतात, याचा सारासार विचार मुलांकडे नसतो. या मुलांना अशा गोष्टींपासून दूर नेण्यासाठी शाळांनी, पालकांनीच पुढाकार घेऊन उपक्रम राबविणे गरजेचे आहे.

-आनंद नाडकर्णी, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ.

Story img Loader