प्रत्येक शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर असलेल्या सिग्नल परिसरात अनेकांचे जीवन घडत अथवा बिघडत असते. पोटाची खळगी भागवण्यासाठी भीक मागणे किंवा काही तरी साहित्य विकून त्यांची गुजराण सुरू असते. वर्षांमागून र्वष जातात आणि ही मुले पुढे मोठी होतात. मात्र तोपर्यंत येथील वातावरणाने त्यांच्यामध्ये अनेक बदल घडवलेले असतात. ती निरनिराळ्या व्यसनांच्या अधीन होतात. गुन्हेगारी जगताशी त्यांचा संबंध येऊन ही मंडळी पुढे जीवनात वाहवत जातात. या मुलांचे पालकही याच व्यवस्थेचा भाग बनून राहिलेले असतात. देशातील वेगवेगळ्या भागांतून येऊन शहराच्या सिग्नलखाली बस्तान बांधणाऱ्या या मुलांची अवस्था पाहता दैनंदिन गरजांसाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. जिथे दोन वेळच्या जेवणाचीच भ्रांत तिथे शिक्षणाचा कोण विचार करणार? शिक्षण नसल्यामुळे अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या या मुलांसाठी कोणताच प्रगतीचा मार्ग उरत नाही. या मुलांना ज्ञानमार्गावर आणण्यासाठीच ठाणे शहरामध्ये एक महत्त्वाचा प्रयोग राबवला गेला तो म्हणजे सिग्नल शाळा. या सिग्नल शाळेतला एक फेरफटका..

सिग्नल शाळेची गरज..

सिग्नलवरच घर असणाऱ्या मुलांना महापालिकेच्या शाळांमध्ये पालक पाठवत नसल्याने या मुलांसाठी त्यांच्या दारातच शाळा उभारण्याचा संकल्प ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेने केला. जूनपासून सुरू झालेल्या या शाळेत सध्या २० विद्यार्थी आहेत. महापालिकेने त्यांना एक कंटेनर दिला असून त्यामध्ये ही अनोखी शाळा सुरू झाली आहे. वय वर्षे अडीच ते १४ पर्यंत मुले या शाळेत आहेत. ठाणे महापालिकेचे महापौर संजय मोरे, आयुक्त संजीव जयस्वाल आणि सहायक आयुक्त मनीष जोशी यांच्या सहकार्याने ही शाळा उभी राहिली आहे.

शाळेआधीची तयारी

सिग्नल शाळेची सुरुवात करण्यापूर्वी संस्थेच्या वतीने शहरात सर्वेक्षण करून सिग्नलजवळील मुलांचा अभ्यास करण्यात आला. रस्त्यावर राहत असल्यामुळे मुले अस्वच्छ होती. मळलेले कपडे, वाढलेले केस, मळकट शरीर यामुळे त्यांच्यातील बालपणीचे नैसर्गिक आणि निरागस सौंदर्य हरवून गेले होते. तेच सौंदर्य पुन्हा उजळण्यासाठी शाळेमध्ये मुलांच्या वैयक्तिक स्वच्छतेपासूनच करायचे ठरवले. त्यानुसार शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी मुलांचे केस कापण्यात आले. प्रत्येक मुलाचा केस कापण्याआधीचा आणि नंतरचा असे दोनदा फोटो काढण्यात आले. प्रत्येक मुलाला त्यांचा केस कापण्याआधीचा व केस कापून झाल्यानंतरचा फोटो दाखवण्यात आला. फोटो पाहताना मुलांच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव दिसत होते. फोटो पाहून काहींनी डोळे मोठे केले, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केले. आपण काही तरी वेगळेच दिसत आहोत असे प्रत्येकाला वाटत होते. सर्व मुलांना आपले केस कापल्यानंतरचे फोटो आवडले. केस कापण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शाळेत दात घासून, व्यवस्थित आंघोळ करून, नीटनेटके शाळेत यावे अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष किती जण या सूचना पाळतील, अशी शंका होती.

पोषण आहार..

खाऊ  खाणे हा मुलांच्या आवडीचा विषय. त्यामुळे कोणता खाऊ  मिळणार याची उत्सुकता त्यांना लागून राहिली होती. मुलांना स्वच्छतेची शिस्त लागावी यासाठी पहिल्या दिवसापासूनच त्यांना जेवणाआधी हात धुऊन वसण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. मदतनीस ताईनी रांगेप्रमाणे मुलांचे हात स्वच्छ धुऊन घेतले. हात धुऊन झाल्यानंतर टेबलावर ठेवलेल्या रुमालाने हात नीट पुसून जागेवर मुलांना बसवले गेले. सर्व जण बसल्यावर सर्वाना डोळे बंद करून हात जोडण्यास सांगितले. एक-दोन मुलांनी विचारले, ‘‘आता कशाला डोळे बंद करायचे?’’ ‘‘आता खायचा आहे ना..’’ मुलांनी विचारलेले हे प्रश्नांना तितकीच समर्पक उत्तर देऊन त्यांचे समाधान करण्यात आले.

दृक्-श्राव्य माध्यमाचा वापर

इथल्या शिक्षण पद्धतीचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात दृक्-श्राव्य माध्यमाचा वापर करण्यात आला आहे. समर्थ भारत व्यासपीठचे  पुरुषोत्तम आगवण यांच्या पुढाकाराने नॉर्थ स्टार रोटरी ट्रस्टच्या मोरेश्वर भांबुरे यांनी इयत्ता पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम दृक्श्राव्यमाध्यमात उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमामुळे मुलांना आकलन करणे अधिक सोपे जाते. विविध वयोगटातील मुलांना वेगवेगळा अभ्यासक्रम आहे आणि अन्य मुलांप्रमाणेच त्यांना अक्षरओळख त्याचबरोबर हस्तकौशल्य, खेळ असे अनेक प्रकार शिकवले जातात. मुख्य म्हणजे हे विद्यार्थी ठाणे महापालिका शाळेच्या पटलावर आहेत.

सिग्नल शाळेचे शिक्षक वर्ग..

या शाळेतील चार शिक्षिका समर्थ भारत व्यासपीठच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यां आहेत. आरती नेमाणे, आरती परब, पल्लवी जाधव आणि योगिता सावंत. त्यापैकी आरती नेमाणे यांचा बाल्यावस्थेतील मुले या विषयावर अभ्यास आहे. आरती परब या बी.एड. असून त्यांचा मराठी विनाअनुदानित शाळांवर विशेष अभ्यास आहे. आरती परब या सिग्नल शाळेच्या मुख्य व्यवस्थापिका असून अ‍ॅड. पल्लवी जाधव या एमएसडब्ल्यू आहेत. योगिता सावंत या हस्तकौशल्य शिकवतात. याशिवाय अनेक विषयांतील तज्ज्ञ मंडळीसुद्धा इथे वेळ काढून आवर्जून शिकवायला येतात. बावीस वर्षे एक प्रयोगशील बालवाडी चालविणाऱ्या शिलाताई वागळे यांनी सिग्नल शाळेची माहिती मिळताच दररोज एक तास या शाळेसाठी देण्याचे ठरविले. त्या सध्या येथे नियमितपणे येत असतात. अपर्णा सुनील, प्रा. भारती जोशी, संध्या सावंत, निवृत्त प्रयोगशील मुख्याध्यापिका संध्या धारडे, कल्पना गोरे, अजित परांजपे, प्रा. पांडे, नेत्रा नागेश, नंदिता आंब्रे, मृणालिनी नायनिरगुडे आदी कार्यकर्त्यांनी सिग्नल शाळेला मदत केली आहे. शाळेचे वेळापत्रक, शाळेच्या कंटेनरचे डिझाईन बनविणे, पोषक आहाराचा मेन्यू ठरवणे, मुलांची आरोग्य तपासणी करणे, मुलांच्या पालकांशी संवाद साधणे अशा प्रत्येकगोष्टीत कार्यकर्त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले आहे.

पाहुण्यांना केवळ शनिवारी प्रवेश..

सध्या एक सिग्नलवर सुरू झालेल्या या शाळेत शहरातील सर्व वंचित मुलांना संधी मिळावी यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. केवळ शिक्षणच नाही तर मुलांचा सर्वागीण विकास व्हावा या दृष्टीने संस्था या ठिकाणी लवकरच खेळाची साधने बसविणार आहे. त्याचप्रमाणे सुरक्षितता म्हणून या ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षकही नेमला जाणार आहे. कुतूहल म्हणून पाहायला येणाऱ्या अनेक जणांना शाळेत फक्त शनिवारीच प्रवेश आहे. मुलांचं वेळापत्रक बिघडू न देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याच वर्षी सुरू झालेली शाळा आणि त्यातील विद्यार्थ्यांविषयी अनेकांना कुतूहल आहे. बेघर आणि बेरोजगार म्हणून शहरात आलेल्या या कुटुंबाना रोजगार आणि त्यांच्या मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी संस्था कष्ट करीत आहे, अशी माहिती संस्थेचे भटू सावंत यांनी दिली.

शाळेचा पहिला दिवस

१५ जुलै रोजी शाळेचा पहिला दिवस होता. शाळेत मुले येतील की नाही ही धाकधूक कार्यकर्त्यांना लागली होती. मात्र पहिल्याच दिवशी शाळेची पटसंख्या २२ होती. परिसरातील मंदिरातून पाणी आणून मुलांनी आंघोळ केली होती. शिवाय दातही घासले होते. जुने परंतु स्वच्छ कपडे मुलांनी घातले होते. काहींचे थोडेसे मळकट, फाटलेलेही होते. मात्र शाळेच्या उत्सुकतेपोटी मुले तशीच आली होती. शाळा कधी उघडली जातेय याचीच मुले वाट पाहत होती. शाळेच्या गेटजवळ मुलांची झुंबड उडाली होती. शाळेबद्दलची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. या शाळेचा वर्ग म्हणजे एक लोखंडी कंटेनर असून त्यामध्ये ही शाळा भरते. वर्ग (कंटेनर) उघडताच मुले आत जाऊन बसली आणि एकच कल्ला सुरू झाला. शाळेत येण्याचा काहींचा हा पहिलाच अनुभव होता, तर काहींना जुना. म्हणजे काही मुले गावी वसतिगृहातील शाळेत शिकत होती. गावी जाण्यास त्यांना अवधी असल्यामुळे तीही मुले या शाळेत सामील झाली होती. काही मुलांनी अर्धवट शाळा सोडली होती. त्यामुळे या मुलांना शाळेत येऊन बसणे नवीन नव्हते. प्रत्येक मुलाचे नाव कार्यकर्त्यांच्या लक्षात राहत नसल्याने कुणालाही बोलावताना ‘ए बाळ’ अशीच हाक मारली जात होती. मात्र या हाकेचे मुलांना खूपच आकर्षण वाटू लागले. त्यामुळे प्रत्येक जण ‘ए बाळ, ए दादा’ अशा हाकेने एकमेकांना संबोधू लागला. शाळेचे वातावरण अधिकच प्रेमळ बनले होते. वर्गाची सुरुवात राष्ट्रगीत व प्रार्थनेने करण्यात आली. मुलांना सोप्पी, म्हणता येईल अशी प्रार्थना शिकवण्यास सुरुवात झाली. ‘नाच रे मोरा’, ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ अशा बडबडगीतांनी मुलांशी संवाद साधायला शिक्षकांनी सुरुवात केली. गाण्याच्या शब्दांसोबत तशी कृती करणे आवडत होते, पण त्यांच्यातला लाजाळूपणा त्यांना अडवत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य होते. बडबडगीते ऐकायला मुलांना आवडत होती.

उपक्रमांची रेलचेल..

सिग्नल शाळेमध्ये पहिल्या दिवसांपासून वेगवेगळ्या उपक्रमांची जणू रेलचेल सुरू आहे. मुलांना हस्तकलेचे शिक्षण देण्यात येत असून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कागदी वस्तूंची निर्मिती केली आहे. मुले फ्लॉवरपॉटसारख्या वस्तूही आवडीने बनवितात. सध्या मुलांनी शाळेमध्ये राख्या बनवल्या असून रक्षाबंधनच्या दिवशी याच राख्या ते आपल्या भावाबहिणींना बांधणार आहेत. बासरीवादक विवेक सुतार आणि त्यांच्या शिष्यांनी या शाळेत उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना बासरीवादनाची प्रात्यक्षिके दाखवली. काही शाळा सोडून दिलेल्या विद्यार्थ्यांनीही या शाळेमध्ये प्रवेश घेतला असून या मुलांच्या निबंधातून शाळेचे चित्रण वाचणे अधिकच उत्साहवर्धक आहे. मोहन या विद्यार्थ्यांने सिग्नल शाळेबद्दल मांडलेले मत खूपच वास्तवदर्शी आहे.

 आरोग्य तपासणी..

शिक्षण सुरू झाले असले तरी मुलांच्या आरोग्याची काळजीही घेतली पाहिजे या दृष्टीने डॉ. मेधा भावे यांच्या सहकार्याने वैद्यकीय तपासणी शिबीरही येथे राबवण्यात आले. ज्या काही आरोग्यविषयक समस्या होत्या, त्यासाठी डॉक्टरांनी औषधोपचार देऊन मुलांना बरे केले. एका मुलीला पायावर खरूज झाली होती. बसताना जखमेला कपडा लागून पाय दुखत असल्याने तिचे रडणे सुरू असते. तिच्यावर औषधोपचार झाल्यानंतरही ती व्यवस्थित झाली.

मला बाईंसारखे शिक्षिका व्हायचे आहे

पहिल्या दिवसापासून मी या शाळेत येते. मला शाळेत यायला खूप आवडते. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त चाफा आणि मोगऱ्याची फुले विकण्याची कामे करते. शाळेतल्या बाईंना येताना पाहिले की, आई शाळेत जा म्हणून सांगते. बाईंनी शिकवलेले १ ते ५० अंक मला मोजता येतात. बाईंसारखेच शिक्षक व्हायचे आहे, ही शाळा सुरू केल्यामुळे माझी भीती गेली आहे.

– नंदिनी पोवार, विद्यार्थिनी

 

योग्य मार्गदर्शनाची गरज..

इथे येणारे विद्यार्थी खूप हुशार आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन दिले तर ती खूप प्रगती करतील. प्रत्येकाच्या घरातील परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळे या मुलांना त्यांच्या कलाने वागवावे लागते. जेवढे ज्ञान आमच्याकडे आहे, तेवढे ज्ञान या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. तसेच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते.

– पल्लवी जाधव, शिक्षिका

 

मी कॉलेजमध्ये जाणार

मला गाणे गायला आवडत नाही, पण शाळेत बाईंनी शिकविलेला सगळा अभ्यास आवडतो. माझे अंक पाठ झाले असून बाराखडीपण मला म्हणता येते. दररोज कळव्याहून मी शाळेसाठी येते. उरलेल्या वेळेत गजरा विकते. मला कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जायचे आहे. मला वंदे मातरम् म्हणायला खूप आवडते. तसेच शाळेत दुपारचे चपाती-भाजीचे जेवण मिळते. बाईंनी दिलेला गृहपाठ दररोज पूर्ण करते.

– कल्पना पोवार, विद्यार्थी

 

आरोग्याचीही घेतली जाते काळजी..

डिजिटल पद्धतीने शिकविल्यामुळे त्यांना समजणे सोपे जाते. तसेच अनेक चित्रे त्यांना दाखवता येतात. यामुळे प्राणी-पक्षी, रंग ओळखणे आदी गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. दररोज १ ते १०० अंक आणि बाराखडीही त्यांच्याकडून बोलून घेतली जाते. रोजच्या रोज शरीराची स्वच्छता राखल्याने काय फायदा होतो हे त्यांना पटवून दिले जाते. तसेच औषध देणे, लावणे डॉक्टरकडे घेऊन जाणे आदी गोष्टींचीही काळजी घेतो.

– भटू सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी

(संकलन – भाग्यश्री प्रधान)