बदलापूर: बदलापुरातील एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांनी कर्जत येथून अटक केली आहे. मंगळवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावरून फटकारले होते. त्याचवेळी दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. त्याच्या २४ तासातच पोलिसांनी उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांना अटक केली आहे.
हेही वाचा >>> वेश्याव्यवसायातून थायलंडच्या १५ महिलांची सुटका, उल्हासनगरमधील घटना
बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणानंतर देशभरात गदारोळ झाला. या प्रकरणी पालकांनी संबंधित अत्याचाराच्या प्रकरणाबद्दल माहिती देऊनही शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या जबाबदार व्यक्तींनी दुर्लक्ष केले. २० ऑगस्ट रोजी शहरात झालेल्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर न्यायालयाने त्याची दखल घेत या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेच्या संचालकांवर ही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. २० ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात झालेल्या तोडफोडीची पाहणी करणारे संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि तुषार आपटे दुसऱ्याच दिवसापासून फरार होते. सुरुवातीला कल्याण सत्र न्यायालयात या दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज फेटाळल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरूणाला अटक
मंगळवारी झालेल्या उच्च न्यायालयातील सुनावणीत न्यायालयाने पोलिसांना फटकारले होते. पोलीस आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर होण्याची वाट पाहत आहेत का, असे खडे बोल न्यायालयाने पोलिसांना सुनावले होते. तसेच यावेळी न्यायालयाने आरोपींचा जामीनही फेटाळला होता. त्याच्या २४ तासातच उल्हासनगर परिमंडळ ४च्या पोलिसांनी कर्जत येथून अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अटक केली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी लोकसत्ताशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. दोन्ही आरोपी सोबत होते. त्यांना कर्जत येथून ताब्यात घेतले आहे. अटकेची कारवाई सुरू आहे, अशी माहिती सचिन गोरे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. जवळपास ४४ दिवसांपासून फरार असलेले शाळेचे अध्यक्ष आणि सचिव न्यायालयाच्या दट्ट्यानंतर २४ तासातच अलगद पोलिसांच्या हाती लागल्याने पुन्हा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.