पोलिसांच्या तत्परतेने मुलांचा शोध

अंबरनाथ: मौजमजेसाठी शाळेला दांडी मारत चार विद्यार्थ्यांनी थेट गोवा गाठल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. अंबरनाथ पूर्वेतील एका खासगी शाळेतील हे चारही विद्यार्थी नुकतेच दहावीच्या वर्गात गेले होते. मंगळवारी शाळेत गेलेले हे विद्यार्थी घरी न परतल्याने त्यांच्या आई-वडिलांनी शाळेत धाव घेतली. मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे पालकांनी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तपासानंतर या चारही विद्यार्थ्यांनी गोवा गाठल्याचे समोर आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी भागात एका खासगी शाळेत मंगळवारी नियमितपणे दहावीचा अतिरिक्त वर्ग भरला. या वर्गात शिकणारा एक विद्यार्थी शाळा संपल्यानंतरही घरी परतला नाही. त्यामुळे पालकांनी शाळेत धाव घेतली. मात्र विद्यार्थी शाळेतच आला नसल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. सोबतच आणखी तीन विद्यार्थी शाळेत आले नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्या तीन विद्यार्थ्यांची चौकशी केली असता तेही शाळेत आले नसल्याचे मात्र घरातून बाहेर पडल्याचे समजले. या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता सर्वांनी मोबाईल घरीच ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर पालकांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात धाव घेत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पालकांनी मुलांचे मोबाईल तपासले असता त्यात एका विद्यार्थ्याने आपल्या मित्राकडे गोव्यातील चांगल्या हॉटेल बाबत चौकशी केल्याचे संदेश आढळले. त्यामुळे पोलिसांनी हाच धागा पकडत तपास केला असता हे चारही विद्यार्थी गोव्याला मौजमजेसाठी गेल्याचे तपासात आढळून आले.

हेही वाचा >>>डोंबिवली: दारु पिण्याची हौस भागविण्यासाठी डोंबिवलीत वाहनांची चोरी

पोलिसांनी या विद्यार्थ्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली. या चारही विद्यार्थ्यांना गोव्यात ताब्यात घेण्यात आले असून अंबरनाथचे शिवाजी नगर पोलीस त्यांना परत आणण्यासाठी रवाना झाल्याचे शिवाजी नगर पोलिसांनी सांगितले आहे. गळ्यातील सोनसाखळी आणि घरातील काही पैसे घेऊन हे विद्यार्थी गोव्याला गेल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रतापामुळे पालकांना मात्र मनःस्ताप सहन करावा लागला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School students of ambernath reached goa directly by skipping school for fun amy
Show comments