लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना निर्सग शिक्षण देण्याचा निर्णय आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला असून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार असून शाळांमध्ये निसर्ग संकल्पनेवर आधारित सत्रे आणि अभ्यास दौरे होणार आहेत. विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर बनविण्याच्या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ठाणे महापालिकेच्या शाळांमधील पाचवी ते दहावीत शिक्षण घेणाऱ्या सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षण देण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेचा शिक्षण विभाग आणि बीएनएचएस यांच्यात निसर्ग शिक्षण उपक्रमासाठी करार झाला असून त्याची अमलबजावणीही सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात, बीएनएचएसचे शिक्षण अधिकारी आणि समन्वयक पर्यावरण जागरुकता या विषयावर संवादात्मक आणि संकल्पनांवर आधारित सादरीकरण आयोजित करतील. पक्षी, फुलपाखरे, वनस्पती, आपल्या सभोवतालची जैवविविधता, प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण, स्वच्छ भारत अभियान, पर्यावरणपूरक जीवनशैली यांच्याबद्दलचे कार्यक्रम शाळांमध्ये पुढील वर्षभर आयोजित केले जाणार आहेत. याशिवाय, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी संवर्धन शिक्षण केंद्र, ठाणे खाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी नेण्यात येईल. खाऱफुटी, वनस्पती, पक्षी यांच्याबद्दलच्या नोंदी करण्यास मार्गदर्शन केले जाईल. या उपक्रमामुळे, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना निर्सग शिक्षण मिळेल, त्यातून पर्यावरण विषयक जागरुकता वाढेल. विद्यार्थ्यांना मुंबई-ठाण्यातील पर्यावरण, वने, वन्यजीव, जैवविविधता, त्यांच्या संवर्धनातील आपली भूमिका यांच्याबद्दल माहिती मिळेल. जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यत हा उपक्रम पोहोचवून पर्यावरण साक्षरता वाढवण्यास मदत होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
आणखी वाचा-डोंबिवली अभ्यासिका नऊ महिन्यांपासून बंद, पालिकेने ४० लाख खर्चून बांधली अभ्यासिका
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) ही भारतीय उपखंडातील सर्वात मोठी पर्यावरण संशोधन संस्था आहे. निसर्ग सवंर्धन, संशोधन आणि शिक्षण या तीन क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे. सुमारे १४० वर्ष जुनी असलेली ही संस्था केंद्र सरकार, राज्य सरकार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था यांच्यासह विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने कार्यरत आहे. पर्यावरण संवर्धन आणि जतन यांच्यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. ठाणे खाडी क्षेत्र, फ्लेमिंगो संवर्धन यावरही संस्था काम करीत आहे.
वंचित समाजातील, निम्न आर्थिक स्तरातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी जाणून घेण्याची, जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व समजून घेण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत ही संधी मोलाची ठरेल. बीएनएचएस सारख्या नावाजलेल्या संस्थेचे निसर्ग शिक्षणासाठी सहकार्य मिळाल्यामुळे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. ठाण्याचे नागरिक म्हणून त्यांची जडणघडण होत असताना पर्यावरणविषयक जागृती त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी ठरेल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.