पूर्वा भालेकर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या मिल्हे जिल्हा परिषद शाळेत सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आणखी ९० शाळांमध्ये ही योजना राबविण्याचे जिल्हा परिषदेने ठरविले होते. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ३५ शाळांमध्ये सौर यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. शाळेला सौर ऊर्जेपासून वीजनिर्मीती केली जात असून यामुळे शाळांमध्ये पाणी पुरवठा करणेही शक्य झाले आहे. आता, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शाळांमध्ये सौर यंत्रणा बसविण्याचा मानस जिल्हा परिषद प्रशासनाचा आहे.

ग्रामीण भागात वीज देयक भरलेले नसल्यामुळे अनेकदा शाळेतील वीज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकार घडले आहेत. याचा परिणाम, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत होता. ही बाब लक्षात घेऊन सहा ते सात महिन्यांपूर्वी मुरबाड तालुक्यातील मिल्हे जिल्हा परिषद शाळेत सौर ऊर्जेचा प्रयोग यशस्वी करण्यात आला. या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरत असून सुमारे ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचे वर्षभराचे वीजदेयक २२ ते २३ हजार रुपयांपर्यंत येत होते. परंतू, सौर ऊर्जा यंत्रणा बसविल्यानंतर पावसाळा सोडल्यास इतर दिवसांमध्ये दररोज या शाळेत ५ ते ६ युनिट वीज निर्मिती केली जाते. या शाळेत ६ युनिटपैकी केवळ २ युनिट दररोजच्या वापरासाठी खर्च होत. उर्वरित वीज साठवून ती महावितरण विभागाला विक्री केली जाते.

आणखी वाचा-आधी डोक्याला चटके, मग मिळते लोकल; बदलापूर रेल्वे स्थानकात छप्पराअभावी प्रवाशांना उन्हाच्या झळा

या यशस्वी प्रयोगाच्या यशानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने पहिल्या टप्प्यात आणखी ३५ शाळांमध्ये ही यंत्रणा बसविण्याचे ठरविले होते. यामध्ये शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा समावेश होता. या शाळांमध्ये सौर यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. या यंत्रणेद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय आणि लघू नळ योजना राबविण्यात आली आहे. त्यासह, सौर ऊर्जेद्वारे प्रति महिना १२० युनिट वीज निर्मिती केली जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील २१, मुरबाडमधील १२ आणि भिवंडीमधील दोन शाळांचा समावेश आहे.

उर्वरित शाळांमध्ये लवकरच ही योजना राबविणार

या योजनेचे काम उर्वरित शाळांमध्ये हाती घेण्यात आले आहे. या शाळांमध्ये जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करायची आहे. त्यासाठी, शाळांमध्ये ॲान ग्रीड सौर यंत्रणा बसविण्यात येत असून या यंत्रणेमुळे पाण्याच्या योजनेबरोबरच शाळेच्या वीज देयकात बचत होणार आहे. तर, भविष्यात या यंत्रणेद्वारे लघु नळ पाणी पुरवठा योजना आणि पावसाच्या पाण्याने विंधण विहीरीचे पुनर्भरण करुन भूजलाची पातळी वाढविण्याचा तसेच वीज निर्मिती करण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा मानस आहे.

आणखी वाचा-शहापूरजवळ कलाकारांसाठी वृध्दाश्रम उभारण्याच्या हालचाली; भिवंडी, शहापूर भागात जमिनीची चाचपणी

या शाळांमध्ये जल जीवन मिशनअंतर्गत नळ जोडणी आणि पिण्याच्या पाण्याची सोय करायची होती. त्यासाठी सौरयंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. या प्रकल्पामुळे पाण्याच्या योजनेसह वीज निर्मिती होत आहे. यामुळे शाळेच्या विज देयकात बचत होण्यास मदत होत आहे. उर्वरित शाळांमध्येही ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. -संजय सुकटे, उपअभियंता, यांत्रिकी विभाग, जिल्हा परिषद, ठाणे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schools of thane zilla parishad started on solar system mrj