महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अविचारी निर्णयामुळे डोंबिवलीतील शाळा सध्या संभ्रमात सापडल्या आहेत. शहरातील परीक्षा केंद्र असलेल्या प्रत्येक शाळेला मुख्य परीक्षा केंद्राचा दर्जा देताना परीक्षा मंडळाने अनेक ठिकाणी शाळेतील आसनक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी या शाळांवर लादले आहेत. या अतिरिक्त विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्याची जबाबदारीही या शाळांवर पडल्याने परीक्षा केंद्र असलेल्या शाळा या विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी इतर शाळांच्या व्यवस्थापनाकडे हेलपाटे घालत आहेत.
दहावीचे परीक्षा केंद्र असलेल्या प्रत्येक शाळेला शिक्षण मंडळाने मुख्य परीक्षा केंद्राचा दर्जा दिल्याने येथील व्यवस्थापनांवरील जबाबदारी वाढली आहे. त्यातच मंडळाच्या या भूमिकेमुळे शाळाचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एखाद्या शाळेत दहावीचे ३५० विद्यार्थी बसण्याची क्षमता असताना तेथे ४५० विद्यार्थ्यांना केंद्र देण्यात आले आहे. यापैकी काही शाळांनी अतिरिक्त विद्यार्थ्यांना सामावून घेण्यास असमर्थता दर्शवली असतानाही ‘त्या विद्यार्थ्यांची सोय तुम्ही आजूबाजूच्या शाळांत करा,’ असे सांगून मंडळाने त्यांना परत पाठवले. त्यामुळे मुख्य परीक्षा केंद्रांचे मुख्याध्यापक, अधीक्षक परीक्षा केंद्रासाठी शाळा मिळावी म्हणून इतर शाळांमध्ये जोडे झिजवत आहेत; परंतु ‘आम्हाला मंडळाकडून काही कळवण्यात आले नसल्याने आम्ही परीक्षेसाठी शाळा देऊ शकणार नाही,’ अशी भूमिका या शाळांनी घेतली आहे. त्यामुळे आता शहराच्या एका कोपऱ्यात, दूर अंतरावर असलेल्या शाळांची निवड करण्यात येत आहे, मात्र याचा फटका परीक्षार्थीना बसण्याची भीती आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांचे हाल
डोंबिवली ग्रामीण भागातील दहावीतील विद्यार्थ्यांना गाव परिसरातील शाळेत परीक्षा केंद्र देण्यात आलेले नाही, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. डोंबिवलीजवळील २७ गाव परिसरात दहावीच्या परीक्षेचे किमान दोन ते तीन परीक्षा केंद्रे मंडळाने देणे आवश्यक होते. या भागात एकही परीक्षा केंद्र देण्यात आलेले नाही. ते थेट शहरी पट्टय़ातील विद्यानिकेतन, सखारामशेठ विद्यालयात देण्यात आले आहे. याच भागातील एका इंग्रजी शाळेलाही मंडळाने परीक्षा केंद्राचा दर्जा दिला नाही.
खोणी, देसई, पडले भागांत अनेक शाळा आहेत. तेथील विद्यार्थ्यांना बस, रिक्षाने, खासगी वाहनाने काही किलोमीटर अंतरावरील शाळेत जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योग्य नियोजन असल्याचा दावा
या संदर्भात परीक्षा मंडळाचे सचिव पांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही, मात्र परीक्षा केंद्र, प्रश्नपत्रिका कोठडी यांचे योग्य नियोजन मंडळाकडून करण्यात आले आहे. कोणताही गोंधळ, विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था केली आहे. डोंबिवली ग्रामीण भागात केंद्र वाढवण्याची गरज वाटली तर चाचपणी करून ते केंद्र वाढवण्यात येईल. या भागासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका कोठडी केंद्र सुरू करण्याचा विचार सुरू आहे, असे मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्रश्नपत्रिका कोठडीवरील गर्दी वाढणार
मुख्य परीक्षा केंद्र असलेल्या शाळेला आपल्यासहित अन्य पाच ते सहा उपकेंद्रे असलेल्या शाळेतील परीक्षार्थीच्या प्रश्नपत्रिका आणणे, उत्तरपत्रिका पोहोचवणे ही जबाबदारी असते, मात्र यंदा प्रत्येक परीक्षा केंद्राला मुख्य परीक्षा केंद्राचा दर्जा देण्यात आल्याने प्रश्नपत्रिकांचा ताबा असलेल्या मुख्य केंद्रांवर सर्वच शाळांच्या परीक्षा नियंत्रकांची गर्दी होणार आहे. डोंबिवली पश्चिमेत जोंधळे विद्यामंदिर शाळेत प्रश्नपत्रिकेची कोठडी असणार आहे. या शाळेच्या बाजूला कोपर पुलाजवळ मागील दहा दिवसांपासून महापालिकेने रस्ता खणून ठेवला आहे. त्यामुळे तेथे नेहमीच वाहतूक कोंडी असते. अशात परीक्षेच्या दिवशी येथे आणखी गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. याला पर्याय म्हणून ग्रामीण भागात शिळफाटा लागून असलेल्या शाळेत स्वतंत्र प्रश्नपत्रिका कोठडी केंद्र देण्याची शाळाचालकांची मागणी आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schools search for ssc examinee