ठाणे : ठाणे आणि भिवंडी शहरातील रस्ते आणि पदपथांवर अनेक ठिकाणी वर्षोनुवर्षे भंगार अवस्थेत वाहने धुळखात पडलेली असून या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही वाहने हटविण्याची मोहिम ठाणे आणि भिवंडी महापालिका प्रशासनाने हाती घेण्याचा निर्णय घेतला असून यापैकी ठाणे महापालिका प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय शहरातील भंगार वाहनांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्या तुलनेत रस्ते वाहतूकीसाठी अपुरे पडू लागले असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने रस्ते रुंदीकरण मोहिम राबवून त्यात रस्ते रुंद केले आहेत. याशिवाय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत शहरात कोस्टल रोड, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग यासह मेट्रो प्रकल्प उभारणीची कामे सुरू आहेत. या कामामुळे ही शहरात वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच शहरातील रस्त्यावर उभी असलेल्या भंगार वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशानसाने आता अशी वाहने ठाणे वाहतूक पोलिसांच्या मदतीने हटविण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय शहरातील भंगार वाहनांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. या आढळून आलेल्या भंगार वाहनांच्या मालकांचा वाहन किंवा चेसी क्रमांकाच्या आधारे शोध घेऊन त्यांना वाहने हटविण्याची नोटीस बजावली जाणार आहे. यानंतरही वाहने हटविण्यात आली नाहीतर, पालिका हि वाहने जप्त करून पालिकेच्या मोकळ्या जागेवर ठेवणार आहे. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्यांचा लिलाव करण्याचा विचारही पालिका करीत आहे. या वृत्तास ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दुजोरा दिला आहे.

भिवंडीत भंगार वाहनांवर कारवाई

भिवंडी निजामपुर शहर महापालिका हद्दीतील बेवारस वाहनांवर महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियमानुसार कारवाई करणे, दंड आकारणे आणि वाहन मालक वाहन घेऊन गेला नाही तर, त्या वाहनांचा लिलाव करणे, असा प्रशासकीय ठराव करण्यात आला आहे. तसेच महापालिका आयुक्तांना महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर किंवा पदपथावर ठेवण्यात आलेली वाहने नोटीसविना काढूण टाकण्याचा अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यानुसार भिवंडी-निजामपुर शहर महापालिकेमार्फत शहरातील बेवारस वाहने हटविण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने नागरिकांना महत्वाची सुचना केली आहे.

नागरिकांनी शहरात बेकायदेशीरपणे सोडून दिलेली वाहने किंवा बेवारस वाहने त्वरीत हटवावीत. तसेच महानगरपालिका हद्दीत रस्त्यावर, पदपथावर आणि महानगरपालिकेच्या अन्य क्षेत्रामध्ये बेकायदेशीरपणे वाहने उभी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहन त्वरीत हटविली नाहीतर, महानगरपालिकेमार्फत ही वाहन हटविण्यात येऊन वाहन हटविण्याच्या खर्चापोटी (टोईंग व पार्किंग) ची रक्कम, तसेच दंड वसुल करण्यात येईल. या कार्यवाहीमुळे होणाऱ्या नुकसानीस आपण सर्वस्वी जबाबदार असाल, अशी सुचना पालिका प्रशासनाने केली आहे.