मासेमारी करण्यास १ ऑगस्ट रोजी परवानगी; मात्र समुद्रातील वादळामुळे पालघर जिल्ह्यातील शेकडो बोटी किनाऱ्यावरच
केंद्र सरकारने मासेमारीला १ ऑगस्टपासून परवानगी दिली असली तरी समुद्रात वादळ सुरू असल्याने वसईसह पालघर जिल्ह्यातील शेकडो बोटी किनारपट्टीवरच उभ्या आहेत. वादळी वाऱ्यांचा मच्छीमारांना मोठा फटका बसत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
पावसाळ्यात सुमारे दोन महिने मासेमारी बंद ठेवली जाते. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मच्छीमार खोल समुद्रात मासेमारीसाठी जात असतात. दरवर्षी पारंपरिक प्रथेनुसार नारळी पौर्णिमेला विधिवत पूजा करून मच्छीमार समुद्रात जात असतात. त्यानंतर १५ ऑगस्ट हा दिवस ठरविण्यात आला होता; परंतु मागील वर्षांपासून शासनाने १५ ऑगस्टऐवजी १ ऑगस्ट हा पुन्हा मासेमारीचा दिवस निश्चित केला. मात्र याचा मच्छीमारांना फायदा झालेलाच नाही. कारण सध्या समुद्रात असलेल्या वादळामुळे मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाताच आलेले नाही. त्यांच्या बोटी समुद्रकिनारी उभ्या असून ते वादळ शमण्याची वाट बघत आहेत. बोटी समुद्रात न गेल्याने मच्छीमारांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
याबाबत बोलताना पाचूबंदर येथील स्थानिक मच्छीमार जॉन्सन कोळी यांनी सांगितले की, एक बोट मासेमारीसाठी खोल समुद्रात जाते तेव्हा ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी बोटीत डिझेल, बर्फ, नाशवंत पदार्थासह किराणा भरून ठेवावा लागतो. शिवाय खलाशांना आगाऊ पैसे द्यावे लागतात. एका बोटीवर साधारण १५ खलाशी असतात. त्यांना प्रत्येकी आठ हजार रुपये याप्रमाणे ५० टक्के आगाऊ रक्कम द्यावी लागते. परंतु बोटी समुद्रात न गेल्याने मच्छीमारांना याचा आर्थिक फटका बसला आहे. कारण बर्फ वितळते, नाशवंत पदार्थ खराब होत आहेत, शिवाय खलाशांनाही आगाऊ रक्कम देण्यात आलेली आहे. म्हणजे एका मच्छीमार बोटमालकाला किमान २५ ते ३० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
हवामानाचा अंदाज..
शासनाने एक ऑगस्टपासून मच्छीमारीला परवानगी दिली असली तरी हा निर्णय मच्छीमारांना बंधनकारक नाही. मच्छीमार त्यांच्या नेहमीच्या कालावधीत बोटी घेऊन समुद्रात जाऊ शकतात. समुद्रातील वातावरण आणि हवामानाची परिस्थिती पाहून मच्छीमारांनी मासेमारीच गेले पाहिजे, असे सूत्रांनी सांगितले.
२५०० बोटींना फटका
वसईसह पालघर जिल्ह्य़ातील पश्चिम किनारपट्टीवर अडीच हजार बोटी आहेत. त्या सर्वाना या वादळाचा फटका बसलेला आहे. याबाबत बोलताना वसई मत्स्य विभागाच्या परवाना खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षीपासून १ ऑगस्टला परवाना देण्याचा निर्णय झाला आहे. दररोज सकाळी हवामान खाते सूचना देत असते. अद्याप समुद्रात वादळ आणि वारे असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील २४ तास वादळाचा इशारा असून मच्छीमार समुद्रात जाऊ शकणार नाहीत.
मच्छीमार सोसायटय़ांची नाराजी
वसईतल्या विविध मच्छीमार सोसायटय़ांनी या नव्या निर्णयामुळे फटका बसल्याचे सांगितले. वसई मच्छीमार सोसायटीचे सरचिटणीस दिलीप माठक यांनी सांगितले की, दरवर्षी नारळी पौर्णिमा किंवा १५ ऑगस्टला मच्छीमार समुद्रात जात होते; परंतु केंद्र सरकारने केरळ आणि गोव्याच्या धर्तीवर समान कालावधी लागू करण्याच निर्णय घेतला. केरळ किंवा गोव्यात १ ऑगस्ट हा दिवस योग्य असतो. परंतु राज्यातील किनारपट्टीवर ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांत वादळे सुरूच असतात. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे. त्याचा आर्थिक फटका सर्वसामान्य मच्छीमारांना बसला आहे. आधीच मच्छीमार दुष्काळाने कर्जबाजारी झाले होते. या मोसमाच्या सुरुवातीलाच त्यांना २५ ते ३० हजार रुपयांचा फटका बसला आहे.