लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण – नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य अशोक प्रधान यांना रविवारी झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींचा शोध महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सुरू केला आहे. शिक्षण क्षेत्रातील एका ज्येष्ठ व्यक्तिमत्वाला मारहाण झाल्याने कल्याण-डोंबिवलीसह राज्याच्या विविध भागातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विविध क्षेत्रातील मंडळी रविवारी एकत्र येणार आहेत.
रविवारी संध्याकाळी छत्रपती शिक्षण संस्थेतील बडतर्फ शिक्षक संजय जाधव, त्यांचे सहकारी संदेश जाधव, दोन पुरूष, एक महिला यांनी प्रधान यांच्या बंगल्यात प्रवेश केला. संजय जाधव यांनी आपली परिस्थिती हलाखीची झाली आहे. आपणास पुन्हा कामावर घ्या, अशी मागणी केली. प्रधान यांनी त्या संस्थेशी आता आपला संबंध नाही, असे सांगितल्यावर संजय जाधव यांनी प्रधान यांच्या बंगल्याची कडी आपल्या सहकाऱ्यांना बाहेरून लावण्यास सांगितले. आतमध्ये प्रधान यांना बेदम मारहाण केली. प्रधान यांच्या घरी काम करणाऱ्या गृहसेविकेने ओरडा केल्यावर दरवाजाची बाहेरून लावण्यात आलेली कडी उघडण्यात आली. इतर चार आरोपी त्यावेळी पळून गेले. संजय जाधव घरात एकटाच अडकला. त्याला शेजारी मनोहर पालन, भूषण कर्णिक यांनी पकडले. पोलिसांना ही माहिती देताच ते तात्काळ घटनास्थळी आले. प्रधान यांना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. या घटनेप्रकरणी कल्याण-डोंबिवलीसह राज्याच्या विविध भागातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रधान यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केला आहे. संबंधित आरोपीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सीआरपीसी कायद्याने नोटीस बजावली आहे. तपास कामी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत, असे महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी सांगितले.
आणखी वाचा-ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी गर्दी
प्राचार्य प्रधान यांना समर्थन देण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी कल्याण मधील विविध क्षेत्रातील जाणकार मंडळांंनी २६ नोव्हेंंबर, रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता कल्याण पश्चिमेतील कर्णिक रस्त्यावरील नूतन हायस्कूलच्या प्रांगणात उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे आणि सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याप्रकरणातील आरोपींना लवकर अटक करावे, या प्रकरणाचा तपास करून त्यांना कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे पत्र पोलिस आयुक्तांना देणार असल्याचे ठाणे येथील एक जागरूक नागरिक नितीन देशपांडे यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने या प्रकरणात उच्च पोलीस अधिकाऱ्याची बदली होणे आवश्यक आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.