कल्याण जवळील वडवली गाव हद्दीतील निर्मल लाईफ स्टाईल विकासक कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला गुरुवारी रात्री बारा वाजता नऊ जणांनी बेदम मारहाण केली. सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चोरीच्या उद्देशाने ही मारहाण केली असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे.
निर्मल लाईफ स्टाईल विकासक कंपनीचे कल्याण जवळील वडवली येथे सदनिका विक्री कार्यालय आहे. या कार्यालयाजवळ चोवीस सुरक्षा रक्षक तैनात असतात. गुरुवारी रात्री निक्कीकुमार सिंग (२१, रा. वडवली) हे कार्यालयात कर्तव्यावर होते. त्यावेळी नीलेश सलपे (२६), राज सलपे (२३), शंभू आणि इतर सहा जण हातात लोखंडी पाईप, लाकडी दांडके घेऊन कार्यालय आवारात रात्री बारा वाजता आले. एवढ्या रात्रीचे तुम्ही येथे कशासाठी आले आहेत. तुम्ही बाहेर जा, असे सुरक्षा रक्षक सिंग यांनी टोळक्याला सांगताच टोळक्याने सिंग यांना लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने मारहाण केली. एकाने चाकुचे वार सिंग यांच्यावर केले. तू परत येथे दिसलास तर तुला मारुन टाकू अशी धमकी देत मारहाण करुन टोळके पळून गेले.
हेही वाचा >>>डोंबिवली- टिळकनगर शाळेत विद्यार्थ्यांकडून २१ किल्ल्यांची उभारणी
सिंग यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी तरुणांचा शोध सुरू केला आहे. वडवली, मोहने परिसरात काही कंपन्या बंद आहेत. काही गृहप्रकल्प पडिक आहेत. तेथील सामान, भंगाराची चोरी करण्याचे प्रकार या भागात अधिक आहेत. त्यामधून हा प्रकार घडला आहे, अशी माहिती वडवली भागातील नागरिकांनी दिली.